वार्ताहर/जांबोटी
युनियन बँक ऑफ इंडिया बेळगाव व लोकमान्य सोसायटी संचलित लोककल्प फाऊंडेशन बेळगाव यांच्या पुढाकाराने सीएसआर निधी अंतर्गत ओलमणी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेला 15 बेंचचे वितरण शुक्रवारी केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष नामदेव पाटील हे होते. मुख्याध्यापक पी. आर. गुरव यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे रिजनल मॅनेजर एम. एन. कुलकर्णी व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले. त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाच्या असिस्टंट जनरल मॅनेजर व बेळगाव विभागाच्या रीजनल हेड ऑफिसर आरती रुनियार यांच्या हस्ते सरस्वती फोटोचे पूजन केले.
यावेळी लोकमान्य सोसायटी बेळगाव विभागाचे रिजनल मॅनेजर एम. एन. कुलकर्णी म्हणाले, लोककल्प फाऊंडेशनतर्फे खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील 32 गावे दत्तक घेतली असून, त्यांना शैक्षणिक आरोग्य व स्वयं म रोजगार आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी बौद्धिक व शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असतात मात्र त्यांना योग्य मूलभूत सुविधा मिळत नाहीत, त्यामुळे ते गुणवतेत शहरी भागाच्या तुलनेत मागे पडतात. त्याना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा लोककल्पचा संकल्प असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी युनियन बँकेचे चीफ रिजनल ऑफिसर नागराज पाटील, आरती रुनियार यांनी विद्यार्थी व पालकांसाठी असलेल्या बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली.
कार्यक्रम लोककल्प फाऊंडेशनच्या सी एस आर विभाग प्रमुख मालिनी बाली यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाला लोककल्प फाऊंडेशनचे सी एस आर विभागाचे वरिष्ठ साहाय्यक सुरज सिंग राजपूत, युनियन बँक ऑफ इंडियाचे बेळगाव विभागाचे मार्केटिंग अधिकारी संतोष पाटील, व्यवस्थापक मोहन सिंग, मार्केटिंग ऑफिसर नागराज पाटील, लोकमान्य सोसायटी रिजनल ऑफिसर विशवनाथ जोशी, लोकमान्य सोसायटी बेळगाव विभागाचे रिजनल ऑफिस व्यवस्थापक जयराम बेळवटकर, लोककल्पचे स्वयंसेवक संतोष कदम, अनंत गावडे, ग्राम. पं. सदस्य प्रभाकर साबळे, सेवानिवृत्त शिक्षक मारुती साबळे, मल्लाप्पा मादार, शंकर चिखलकर, हणमंत जगतापसह बहुसंख्य पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. टी. मेलगे यांनी केले. मुख्याध्यापक पी. आर. गुरव यांनी आभार मानले.









