द्विपक्षीय चर्चेनंतर पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन :आशियानमध्ये मलेशिया मुख्य भागीदार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवी दिल्लीतील हैदराबाद हाउसमध्ये मलेशियाचे पंतप्रधान दातो सेरी अन्वर बिन इब्राहिम यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी द्विपक्षीय चर्चा केली आहे. या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले आहे. आमच्या भागीदारीला व्यापक आणि रणनीतिक भागीदारीपर्यंत वृद्धींगत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. भारत आणि मलेशिया यांच्यात वाढलेल्या रणनीतिक भागीदारीला एक दशक पूर्ण होत आहे. इब्राहिम यांच्या सहकार्यामुळे आमच्या भागीदारीत एक नवा वेग आणि ऊर्जा निर्माण झाली आहे. आता भारतीय युपीआयला मलेशियन पेनेटशी जोडण्याचे काम करणार आहोत असे उद्गार मोदींनी यावेळी काढले आहेत.
द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीचा विस्तार करावा लागणार आहे. फिनटेक, सेमीकंडक्टर, एआय आणि क्वांटम यासारख्या नव्या तंत्रज्ञानांच्या क्षेत्रांमध्ये आम्हाला सहकार्य वाढवावे लागणार आहे. आम्ही भारताच्या युपीआयला मलेशियन पेनेटशी जोडण्याचे काम करणार आहोत. आशियान आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात मलेशिया हा भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे. भारत आशियानला प्राथमिकता देतो. भारत आणि आशियानदरम्यान एफटीएच्या समीक्षेला कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर आम्ही सहमत आहोत असे उद्गार मोदींनी काढले आहेत.
पंतप्रधान मोदी हे माझे बंधू
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे बंधू आहेत. जेव्हा मी पंतप्रधान नव्हतो, तेव्हाही ते माझ्यासोबत स्नेहपूर्वक वागले. व्यापक रणनीतिक भागीदारीला वृद्धींगत करण्यावर आम्ही सहमत झालो आहोत. आम्ही सर्व क्षेत्रांमध्ये या कामकाजाच्या संबंधांना पुन्हा मजबूत करू. संवेदनशील किंवा अन्य मुद्द्यांवर आम्ही चर्चा करतो. भारत एक महान इतिहास, महान संस्कृती असणारे एक महत्त्वपूर्ण अन् महान राष्ट्र असल्याचे वक्तव्य मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी केले आहे.
अन्नसुरक्षा क्षेत्रात सहकार्य
आम्ही अनेक नवे कार्यक्रम सुरू केले आहेत. भारतीय कंपन्या मलेशियन कंपन्यासोबत मिळून सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. यात ऊर्जा परिवर्तन, डिजिटलायजेशन आणि अन्नसुरक्षा यासारखी नवी आव्हानात्मक क्षेत्रंही सामील आहेत. आम्ही सेमीकंडक्टर क्षेत्रात स्वत:चा अनुभव आणि प्रावीण्य दोन्हींचा उपयोग करण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला असल्याचे अन्वर इब्राहिम यांनी नमूद केले.
तीन दिवसांच्या दौऱ्यावर
मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम हे तीन दिवसीय दौऱ्यानिमित्त सोमवारी नवी दिल्लीत दाखल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आमंत्रणावर अन्वर इब्राहिम यांचा हा दौरा पार पडत आहे. इब्राहिम यांच्यासोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारतात आले आहे. मलेशियाच्या पंतप्रधानांनी दिल्लीत विदेशमंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेतली आहे. तसेच ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. झाकिर नाईकवरून यापूर्वी दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कटूता निर्माण झाली होती. आता दोन्ही देश ही कटूता दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.









