बेनकट्टीतील युवकाच्या खुनाचा पर्दाफाश : अडीच लाखांची सुपारी : पाच जणांना अटक
बेळगाव : बेनकट्टी (ता. सौंदत्ती) येथील युवकाच्या खून प्रकरणी मुरगोड पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. खून झालेल्या युवकाच्या पत्नीवरील आशेपोटी त्याचा काटा काढण्यात आला आहे. यासाठी अडीच लाखांची सुपारी देण्यात आली होती. काडाप्पा रुद्राप्पा शिरसंगी (वय 42) रा. बेनकट्टी, ता. सौंदत्ती याचा शुक्रवार दि. 9 ऑगस्ट रोजी शेतातील नारळाच्या झाडाखाली मृतदेह आढळला होता. पोलिसांनी सुरुवातीला संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद केली होती. शवचिकित्सा अहवालात काडाप्पाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते.
पोलिसांनी सुरुवातीला दोघा जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली होती. नागाप्पा रैनापूर (वय 40) रा. बेनकट्टी हा या खुनाचा सूत्रधार असल्याचे उघडकीस आले होते. 2013 मध्ये नागाप्पाने तालुका पंचायत निवडणूक लढविली होती. त्याचवेळी काडाप्पाची पत्नीही निवडणूक रिंगणात होती. संशयित आरोपी नागाप्पा व खून झालेल्या काडाप्पाची पत्नी यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. काडाप्पाचा काटा काढल्यास त्याची पत्नी आपल्याला मिळणार, या आशेने अन्य पाच जणांच्या मदतीने त्याने हे कृत्य केले आहे. मुरगोडचे पोलीस निरीक्षक इरय्या मठपती व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाच जणांना अटक केली आहे.
प्रमुख आरोपी नागाप्पासह शिवप्पा हुली रा. मबनूर, ता. यरगट्टी, सतीश यमनाप्पा अरिबेंची, रा. जिवापूर, ता. यरगट्टी, लक्ष्मण देवेंद्रप्पा हुली, रा. मबनूर, ता. यरगट्टी, विठ्ठल यल्लप्पा अलदकट्टी, रा. बेनकट्टी, ता. यरगट्टी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी एक जण फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.









