मराठा मंडळ संस्थेच्या विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बलात्काऱ्यांना फाशी झाली पाहिजे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, नोटबंदीसारखा निर्णय एका रात्रीत अंमलात येऊ शकतो. तर महिलांच्या सुरक्षिततेचा निर्णयसुद्धा तितक्याच गतीने घेतला जावा, कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करावे, या आणि अन्य मागण्या करत मराठा मंडळ संस्थेच्या विद्यार्थ्यांनी संस्थाध्यक्षा राजश्री नागराजू यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढला. राणी चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळी करून प्रथम कोलकाता येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाने येऊन निवेदन देण्यात आले. कोलकाता येथे स्वातंत्र्याच्या पूर्व संध्येलाच एका पीजी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्याचा भयावह प्रकार घडला. देशभरात याचे पडसाद उमटत आहेत. बेळगावमध्येही विविध संघटना निषेध करत रस्त्यावर उतरत आहेत.
मराठा मंडळ डेंटल, फार्मसी, पॉलिटेक्निकच्या 600 हून अधिक विद्यार्थी प्राचार्य, उपप्रचार्य व प्राध्यापक यांनी मोर्चात सहभाग घेतला. मराठा मंडळच्या मुख्य कार्यालयापासून चन्नम्मा सर्कलपर्यंत येऊन विद्यार्थ्यांनी तिथे जोरदार घोषणा दिल्या. त्यांनी हातात वेगवेगळे फलक धरले होते. ज्यामध्ये न्यायाची मागणी महत्त्वाची होती. यावेळी बोलताना राजश्री नागराजू म्हणाल्या, देशाला स्वातंत्र्य मिळाले. परंतु आम्हाला स्वातंत्र्य मिळाले का? हा प्रश्न भेडसावतो आहे. बलात्कार करून हत्या करण्याचे हे हिणकस कृत्य निंदनीय असून बलात्काऱ्याला फाशी झालीच पाहिजे. तसेच या प्रकरणातील सर्वांचीच नावे उघड करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. महिलांच्या पोषाखाचा आणि बलात्काराचा काहीही संबंध नाही. या देशात महिलांना न्याय मागण्यासाठी सतत रस्त्यावर यावे लागते, आंदोलन छेडावे लागते, ही अत्यंत दु:खद बाब आहे. सरकारने आता बलात्काऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, किंबहुना फाशी द्यावी, अशी आपली मागणी आहे.
मराठा मंडळच्या प्रत्येक संस्थेवर ‘कोलकाता हॉरर’ असा बॅनर लावण्यात आला आहे व जोपर्यंत कोलकाता प्रकरणी न्याय मिळत नाही. तोपर्यंत हे बॅनर खाली उतरविणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी विद्यार्थिनींनीसुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या व ‘ना चूप रहेंगे ना बरदास्त करेंगे’ अशा घोषणा दिल्या. यानंतर मोर्चाने येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांच्यावतीने तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले. निवेदनात न्यायाला विलंब म्हणजे न्यायाला नकार असा अर्थ होतो. तेव्हा सदर प्रकरणी निलंब करू नये, पीडितेच्या कुटुंबीयांना नैतिक, मानसिक, वैद्यकीय व कायदेशीर पाठिंबा मिळावा. कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी व दोषींना फाशी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. सदर निवेदनाच्या प्रति पंतप्रधान, गृहमंत्री, पश्चिमबंगालचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत. तसेच बेळगाव पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीसप्रमुख यांना देण्यात आल्या आहेत.
अश्रूचे थेंब रेखाटले
कोलकाता बलात्कार प्रकरणी पीडितेच्या चष्म्यांची काच फुटून तिच्या डोळ्यातून रक्त आले. त्यामुळे मोर्चातील प्रत्येक विद्यार्थिनी व प्राध्यापकांनी आपल्या डोळ्याखाली लाल रंगाने अश्रूचे थेंब रेखाटले होते.









