वक्फ सुधारणा विधेयकासंबंधी स्टॅलिन यांना भेटणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वक्फ सुधारणा विधेयकाला संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठविण्यात आले आहे. लवकरच जेपीसीची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि जमीयत उलेमा-ए-हिंदचे सदस्य बैठक घेणार आहेत. जमीयत उलेमा-ए-हिंदने स्वत:चे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांच्या नेतृत्वात वक्फ सुधारणा विधेयक 2024 च्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. जमीयतचे सदस्य देखील सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटत आहेत.
या अभियानाच्या अंतर्गत जमीयतचे सदस्य मुस्लीम वक्फ संपत्तींसाठी आणल्या जाणाऱ्या विधेयकाच्या नुकसानाविषयी विरोधी पक्षांच्या नेत्यांना सांगत आहेत. तसेच ते जेपीसीच्या सदस्यांसोबत संपर्कात आहेत. महाराष्ट्रात अलिकडेच स्वत:च्या चिंता व्यक्त करण्यासाठी जेपीसी सदस्य बाळूमामा म्हात्रे आणि अरविंद सावंत यांची भेट घेतली असल्याचे जमीयतकडून सोमवारी सांगण्यात आले.
ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि जमीयत उलेमा-ए-हिंदचे एक संयुक्त शिष्टमंडळ तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना भेटणार आहे. स्टॅलिन मंगळवारी या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत. स्टॅलिन यांची भेट घेण्यापूर्वी ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि जमीयतचे सदस्य बैठक घेत सहमती निर्माण करतील. वक्फ सुधारणा विधेयकावरून दोन्ही संघटना प्रारंभापासून विरोध करत आहेत.
22 ऑगस्टला जेपीसी बैठक
वक्फ सुधारणा विधेयकावर विचार करण्यासाठी जेपीसीची स्थापना झाली आहे. याचे अध्यक्षत्व भाजप खासदार जगदंबिका पाल करणार आहेत. 22 ऑगस्ट रोजी जेपीसीची पहिली बैठक होणार आहे. ही समिती 22 ऑगस्ट रोजी अल्पसंख्याक कार्य तसेच कायदा आणि न्याय मंत्रालयांच्या प्रतिनिधींना भेटणार असल्याचे लोकसभा सचिवालयाच्या एका नोटीसमध्ये नमूद आहे.









