सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल : देशविदेशात संतापाची लाट
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या झारग्राममध्ये एका वन्य हत्तिणीला पेटवून देण्यात आले आहे. ग्रामस्थांनी हत्तिणीला जिवंत जाळले असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेप्रकरणी संताप दिसून येत आहे. संबंधित हत्तिण ही गरोदर होती असेही सांगण्यात येत आहे. गरोदर हत्तिणीवर एका घरातून पेटते निखारे फेकण्यात आल्यावर ती वेदनेने तळमळत असल्याचे दिसुन येते. व्हिडिओच्या अखेरीस हत्तीण रस्त्यावरच जळाल्याने मृत्युमुखी पडत असल्याचे नजरेस पडते.
आम्ही या घटनेविषयी ऐकले असून व्हिडिओ पाहिला आहे. आम्ही याप्रकरणी चौकशी करत आहोत असे वरिष्ठ वन अधिकाऱ्याने म्हटले आहे. बंगाली दिग्दर्शक तथागत मुखर्जी यांनी फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करत राज्याच्या वनमंत्र्यांच्या मतदारसंघातच गरोदर हत्तिणीची हुला पार्टीकडून (रानटी हत्तींच्या व्यवस्थापनासाठी काम करणारे स्थानिक रहिवासी) अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली असून याप्रकरणी सर्वजण मौन बाळगून असल्याचे म्हटले आहे.
मागील गुरुवारी 5 हत्तींचा समूह झारग्राममध्ये दाखल झाला होता, यात एक गरोदर हत्तिण देखील सामील होती. या हत्तींच्या हल्ल्यात एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि वन विभागाने हत्तींना जंगलात पुन्हा पिटाळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हत्तींचा समूह यादरम्यान गावातून बाहेर पडत झारग्राम राज कॉलेजमध्ये दाखल झला. वन विभागाकडून नियुक्त हुला पार्टीच्या सदस्यांनीच हत्तिणीची क्रूरपणे हत्या केल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे सांगणे आहे. तप्त लोखंडाने वार करण्यात आल्याने हत्तीण गंभीर जखमी झाले आणि यातच तिचा मृत्यू झाला. हत्तीण तडफडत जमिनीवर कोसळत असल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसून येते.