वृत्तसंस्था / कोलकाता
कोलकाता येथील महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकणात अटक केलेल्या आरोपीची पॉलिग्राफी चाचणी करण्यास न्यायालयाने अनुमती दिली आहे. संजय रॉय असे आरोपीचे नाव आहे. सीबीआयने रविवारी आरोपीची मनोवैज्ञानिक चाचणी केलेली आहे. आता लवकरच पॉलिग्राफी चाचणी केली जाणार आहे.
ज्या आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात हा नृशंस गुन्हा घडला, त्या महाविद्यालयाचे माजी प्रार्चाय संदीप घोष यांचीही पॉलिग्राफी चाचणी घेण्याची सीबीआयची योजना असून त्यासंबंधीच्या कायदेशीर प्रक्रियेला लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. संदीप घोष यांची सोमवारी सलग चौथ्या दिवशी कसून चौकशी करण्यात आली. त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात अनेक विसंगती आढळल्या आहेत. त्यामुळे सत्य जाणून घेण्यासाठी त्यांचीही पॉलिग्राफी चाचणी आवश्यक असल्याचे सीबीआयचे मत आहे.
चौकशीची व्हीडीओग्राफी
सीबीआयने पिडितेच्या मातापित्यांचीही विधाने नोंद केली आहेत. या सर्व तपासाची व्हिडीओग्राफी करण्यात आली आहे. संदीप घोष यांच्या जबाबाशी पिडितेच्या मातापित्यांच्या जबाबाची सांगड घालून सीबीआय या प्रकरणातील सत्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. आरोपी संजय रॉय याच्या पॉलिग्राफी चाचणीनंतर त्याचे नार्को परिक्षणही होण्याची शक्यता आहे.









