केरळमधील परिवाराचा दावा : दूतावासाकडून पुष्टीची प्रतीक्षा
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या युद्धात आणखी एक भारतीय मारला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. ही व्यक्ती केरळच्या त्रिसूर जिल्ह्यातील रहिवासी होती. नोकरीच्या शोधात हा इसम दोन एप्रिल रोजी रशियात पोहोचला होता असे त्याच्या परिवाराचे सांगणे आहे. सध्या रशियातील भारतीय दूतावासाने या इसमाच्या मृत्यूची अधिकृतपणे पुष्टी दिलेली नाही.
त्रिसूर जिल्ह्याच्या त्रिक्कुरचा रहिवासी असलेल्या संदीप चंद्रन (36 वर्षे) याच्या परिवाराने त्याच्या मृत्यूची माहिती मिळाल्याचा दावा केला आहे. संदीपचा मृत्यू 16 ऑगस्ट रोजी रशियातील सैन्य ट्रकवर झालेल्या गोळीबारात झाला आहे. रशियात युद्धादरम्यान केरळचा रहिवासी मारला गेल्याची माहिती मल्याळी असोसिएशनच्या व्हॉट्सअॅप ग्रूपवर प्रसारित झाली, यानंतर त्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधला आणि तपशील मागून घेतला. हा तपशील जुळल्यावर मारला गेलेला भारतीय हा संदीपच होता याची पुष्टी त्यांनी दिली. संदीपचा मृतदेह आणण्यासाठी आम्ही भारतीय दूतावास, स्थानिक आमदार आणि खासदाराशी संपर्क साधल्याचे संदीपचा भाऊ सरनने सांगितले आहे.
संदीप हा अविवाहित होता. त्याच्यामागे परिवारात वडिल, आई, छोटा भाऊ आणि छोटी बहिण आहे. संदीपला रशियात नोकरी एका एजेन्सीद्वारे मिळाली होती. मॉस्को येथील एका रेस्टॉरंटमध्ये काम करावे लागेल असे त्याला सांगण्यात आले होते. प्रारंभीच्या काळात संदीप हा स्वत:च्या परिवाराच्या सतत संपर्कात असायचा. युद्धक्षेत्रापासून दूर एका सुरक्षित क्षेत्रात आर्मी कँटिनमध्ये काम करावे लागणार असल्याचे त्याने परिवाराला कळविले होते.
संदीपसोबत जिल्ह्यातील 11 जण रशियासाठी रवाना झाले होते. हे लोक तेथील विविध हिस्स्यांमध्ये आहेत. अनेक युवा आकर्षक नोकरीच्या शोधात रशियाला जात आहेत. हे लोक तेथील युद्ध आणि धोक्यांपासून अनभिज्ञ आहेत. यातील अनेकांची एजेन्सींकडून फसवणूक होत आहे. लोकांना रशियात जाण्यापासून रोखण्यासाठी जागरुकता मोहीम राबविण्याची गरज असल्याचे स्थानिक पंचायत प्रतिनिधी अनु पनमुकुदन यांनी म्हटले आहे.









