स्कुटीवर बसून मित्राशी बोलणे जीवावर बेतले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या करोल बाग भागातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून एअर कंडिशनर युनिट कोसळल्याने एका युवकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे.
या व्हिडिओत एक युवक इमारतीखाली स्कुटीवर बसल्याचे आणि त्याच्या बाजूला त्याचा एक मित्र उभा असल्याचे दिसून येते. दोघेही बोलत असताना अचानक स्कुटीवर बसलेल्या युवकाच्या डोक्यावर एसीचे आउटडोअर युनिट कोसळले. या दुर्घटनेत दोन्ही मित्र जखमी झाले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे स्कुटीवर बसलेल्या युवकाला मृत घोषित करण्यात आले. तर दुसऱ्या युवकाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
मृत युवकाचे नाव जितेश चड्ढा (18 वर्षे) आहे. तर त्याचा मित्र प्रांशू (17 वर्षे) हा पटेल नगरचा रहिवासी आहे. पोलिसांनी या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. एसी कोसळण्याचे कारण शोधण्यासाठी एक फॉरेन्सिक टीम तैनात करण्यात आली आहे.









