फसवणूक करणाऱ्यांने आयजी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचाही केला वापर: सर्व रक्कम ऑनलाईन घेतली: सांगली शहर पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरूध्द गुन्हा दाखल
सांगली प्रतिनिधी
शहरातील गावभागात राहणाऱ्या एका डॉक्टर महिलेच्या मोबाईल नंबरवर 17 पेक्षा अधिक बेकायदेशीर व्यवहार झाले आहेत. तसेच गॅमलिंगचे मेसेज आहेत. त्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्यामुळे तुमच्यावर ईडी अंतर्गत गुन्हा दाखल होणार आहे अशी भीती दाखवून मुंबईतील तिघांनी साडे पंधरा लाखाची फसवणूक केली आहे. या तिघामध्ये एकाने आयजी विश्वास नांगरे-पाटील बोलतो असे सांगून यातून बाहेर पडण्यासाठी तात्काळ आरटीजीएस करा असे सांगून ही रक्कम घेतली आहे. फसवणूक झाल्याचे समजताच तात्काळ डॉ. शितल संजय पाटील रा. गणेश मंगल अपार्टमेंट रा. गावभाग सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. शितल पाटील यांना सात ऑगस्ट रोजी सांयकाळी साडेसात वाजता एका अज्ञात मोबाईल फोनवरून त्यांच्या मोबाईलवर फोन आला. या समोरच्या व्यक्तीने बोलताना आपण सुरेशकुमार दास बोलत आहे असे सांगितले. तसेच तुमचा जो मोबाईल आहे. त्या मोबाईलवर 17 पेक्षा अधिक मेसेज हे बेकायदेशीर व्यवहार केल्याच्या संबधित आहेत. याशिवाय तुम्ही गॅमलिंगही केले आहे. अशी आमच्याकडे तक्रार आली आहे. तुमच्या विरूध्द मुंबई येथील टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी भिती दाखविली. त्यानंतर यासंबधित या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक हेमराज कोळी हे करत आहेत. असे सांगितले तसेच या प्रकरणांत तुमचा काहीही संबंध नसल्याचे सिध्द करण्यासाठी तुम्हाला अकाऊंटवरून पैसे पाठवावे लागतील असे सांगितले. त्यानंतर व्हॉटसअप व्हिडीओ कॉल करून हेमराज कोळी यांनी तुमच्यावर ईडीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असे सांगुन तुम्हाला अटक करण्याची कारवाईही सुरू आहे असे सांगितले. तसेच बनावट नोटीसही त्यांनी व्हॉटसअपवरून फिर्यादी डॉक्टर महिलेला पाठवून दिली.
female doctor by fearing ED
त्यानंतर या संशयितांनी अकाऊंट नंबर पाठविला आणि त्यावर पाच लाख रूपये पाठविण्यास सांगितले. डॉक्टर महिलेने ही रक्कम पाठविली. त्यानंतर पुन्हा त्यांना पैश्याची मागणी केली त्यावेळी या महिलेने सोने तारण ठेवून साडे दहा लाख रूपये जमा केले आणि ते संशयितांनी दुसऱ्याच एका खात्यावर पाठविण्यास सांगितले त्यानुसार त्या खात्यावर ही रक्कम पाठविली. त्यानंतर या डॉक्टर महिलेच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात या तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सांगली शहर पोलीस याचा तपास करत आहेत.