कडोली भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
बेळगाव : कत्तल केलेल्या जनावरांचे टाकाऊ अवयव रस्त्यावर फेकून दिल्याची घटना कडोली येथे घडली आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतीची कामे करणेही कठीण झाले आहे. या प्रकाराविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे. कडोलीहून काकतीला जाणाऱ्या संपर्क रस्त्यावर मार्कंडेय नदीवरील पुलावर टाकाऊ मांस व अवयव टाकण्यात आले आहेत. सुमारे आठ पोत्यांमध्ये भरून पुलावर टाकलेल्या अवयवांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. पक्षी व प्राणी पोती फाडून हे अवयव बाहेर काढत आहेत. शनिवारी सायंकाळनंतर अज्ञातांनी हे कृत्य केल्याचा संशय आहे. रविवारी सकाळी शेतीची कामे करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी हा प्रकार पाहिला. टाकाऊ मांस व अवयव पुलावर उघड्यावर कोणी टाकले? याचा उलगडा झाला नाही.
संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
पोती फाडून मांस खाण्यासाठी पुलावर कुत्र्यांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. उघड्यावर मांस व टाकाऊ अवयव फेकून देणे गुन्हा आहे. ज्यांनी हा प्रकार केला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी किशोर ईश्वर पाटील या शेतकऱ्याने केली आहे.









