केपीएल स्पर्धेसाठी हुबळी संघात निवड
बेळगाव : भारतीय क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आयोजित कर्नाटक प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी कडोली गावचा सुपूत्र व बेळगावचा होतकरु अष्टपैलु खेळाडू आकाश कटांबले याची हुबळी टायगर्स संघामध्ये निवड झाली आहे. त्याला भारतीय ज्येष्ठ क्रिकेटपटू मनिष पांडे यांच्याकडून कॅप देवून गौरव करण्यात आला. केपीएलमध्ये बेळगावमधून एकमेव खेळाडूची निवड यावर्षी करण्यात आली आहे. कडोली गावचा सुपूत्र आकाश कटांबले याने लहानपणापासूनच ठळकवाडी हायस्कूल क्रिकेट संघात आपले क्रिकेटचे धडे गिरविले.
त्यानंतर त्याने गोगटे पदवीपूर्व महाविद्यालयात पुढील क्रिकेटचे धडे गिरवताना धारवाड विभागीय क्रिकेट संघटनेच्या 13 वर्षांखालील, 14, 17, 19 वर्षांखालील संघातून सहभाग घेवून उल्लेखनिय कामगिरी बजावली होती. बेळगावचा ख्यातनाम क्लब बेळगाव स्पोर्टस् क्लबकडून खेळताना आपल्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर त्याने अनेक सामने जिंकून देण्यास सिंहाचा वाटा उचलला. वरिष्ट साखळी क्रिकेट स्पर्धेत बेळगाव स्पोर्टस् क्लब संघाच्या ए डिव्हीजन, बी डिव्हीजनमधून खेळताना त्याने उत्तम कामगिरी बजावली होती. सध्या तो हुबळीच्या बिडीके स्पोर्टस् फौंडेशनच्या संघातून खेळताना 2 शतके, 24 गडी व 15 झेल टिपत अष्टपैलु कामगिरी केली होती.
या संघाने ए डिव्हीजन क्रिकेट संघाने मौसमातील विजेतेपद पटकाविले आहे. आकाश कटांबलेचे गत वर्षी क्रिकट ए डिव्हिजन क्रिकेट मोसमात सर्वादिक गडी टिपण्याचा मान मिळविला होता. या मौसमातील कामगिरीची दखल घेवून भारतीय संघाचा ज्येष्ठ खेळाडू व कर्नाटक राज्याचा कर्णधार विनयकुमार व उपकर्णधार मनिष पांडे यांचे लक्षवेधून घेतले होते. त्यामुळे हुबळी टायगर्स संघाने केपीएल स्पर्धेसाठी हुबळी टायगर संघात स्थान दिले आहे.
एका छोट्याशा कार्यक्रमात उपकर्णधार मनीष पांडे यांनी हुबळी टायगर्स संघाची कॅप देवून त्याचा गौरव करुन त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. सध्या होणाऱ्या केपीएल स्पर्धेत आकाश कटांबलेकडून मोठ्या आशा आहेत. तो पूर्ण करेल, अशी अपेक्षा या ज्येष्ठ खेळाडूंनी केली आहे. आकाश कटांबलेला कर्नाटक राज्याचे प्रशिक्षक मन्सुरअली खान, आर. ए. गौडा, धारवाड विभागीय क्रिकेट संघटनेचे माजी समन्वयक अविनाश पोतदार, प्रमुख प्रशिक्षक संगम पाटील, विवेक पाटील, बाळकृष्ण पाटील, दीपक पवार, प्रमोद पालेकर यांचे बहुमोल मार्गदर्शन तर धारवाड विभागाचे समन्वयक निखिल भूशद बिडीकेची बाबा भूशद यांचे प्रोत्साहन त्यांना मिळत आहे.









