कोलकाता येथील अत्याचार-खुनाच्या निषेधार्थ डॉक्टरांचा आज संप
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय कॉलेजमध्ये झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. राज्यातही शनिवारी ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय खासगी इस्पितळांतील डॉक्टरांनी घेतला आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवेत व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे.
शनिवारी राज्यातील खासगी इस्पितळांमधील डॉक्टरांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे बाह्या रुग्णसेवा (ओपीडी) सेवा स्थगित राहणार आहे. मात्र, इमर्जन्सी सेवा नागरिकांसाठी नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे, असे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले.
इंडियन मेडिकल असोसिएशनने (आएमए) शनिवार 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते 18 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत डॉक्टरांचा 24 तासांचा देशव्यापी संप जाहीर केला आहे. या कालावधीत ओपीडी वगळता सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. इस्पितळांमध्ये येणाऱ्या रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत. तातडीच्या उपचारात कोणतेही अडथळे येणार नाहीत. ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांचे हाल होऊ नयेत, याकरिता उपलब्ध डॉक्टरांच्या मदतीने परिस्थिती हाताळण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारी आणि खासगी इस्पितळांमध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना आरोग्य खात्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत. संप करणाऱ्या डॉक्टरांचा हेतू योग्य आहे. त्यांना संप करू नये, असे सांगणार नाही. मात्र, रुग्णांना त्रास होणार नाही, याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे मंत्री दिनेश गुंडूराव म्हणाले.
सरकारी डॉक्टरांना रजा मंजूर करु नये!
खासगी इस्पितळांमधील डॉक्टर शनिवारी संपावर जात आहे. त्यामुळे ओपीडी सेवेत व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारी राज्यातील सर्व सरकारी इस्पितळांमधील डॉक्टरांना रजा मंजूर करू नये, असा आदेश आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या संचालकांनी दिला आहे.









