पर्यावरण आणि आपत्तींबाबत अचूक माहिती मिळणार : सर्वात लहान रॉकेट ‘एसएसएलव्ही’वरून रवाना
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) देशातील सर्वात लहान रॉकेट एसएसएलव्ही-डी3 च्या माध्यमातून श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून शुक्रवारी पृथ्वी निरीक्षण उपग्रह-08 (ईओएस-08) प्रक्षेपित केले. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी प्रक्षेपण यशस्वी झाल्याची घोषणा करतानाच संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
ईओएस-08 हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेबाहेर सुमारे 475 किमी अंतरावर स्थापित करण्यात आला. तो एक वर्षभर काम करेल. ईओएस-08 उपग्रहाचा उद्देश पर्यावरण आणि आपत्तीबाबत अचूक माहिती देणे हा आहे. यापूर्वी इस्रोने प्रक्षेपणाची तारीख 15 ऑगस्ट निश्चित केली होती. मात्र, त्याचे प्रक्षेपण एक दिवस विलंबाने करण्यात आले.
अवकाशात पाठवलेल्या ईओएस-08 उपग्रहामध्ये तीन पेलोड आहेत. यामध्ये इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड पेलोड (ईओआयआर), ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम-रिफ्लेक्टोमेट्री पेलोड (जीएनएसएस-आर) आणि एसआयसी-युव्ही डोसीमीटर समाविष्ट आहे.
ईओआयआर पेलोड आपत्ती निरीक्षण, पर्यावरण निरीक्षण यासारख्या उद्देशांसाठी प्रतिमा पॅप्चर करण्यासाठी डिझाइन केलेला असून तो दिवसा आणि रात्री देखील प्रतिमा पॅप्चर करू शकतो. तर, जीएनएसएस-आर पेलोडच्या माध्यमातून समुद्राच्या पृष्ठभागावरील वाऱ्याचे विश्लेषण, जमिनीतील आर्द्रतेचे मूल्यांकन आणि पूरशोधक रिमोट सेन्सिंग क्षमता तपासली जाणार आहे. एसआयसी-युव्ही डोसीमीटर पेलोड गगनयान मोहिमेसाठी अल्ट्राव्हायोलेट किरणांचे निरीक्षण करणार असल्याने अनेक उद्देश साध्य होणार आहेत.
इस्रोच्या सर्वात लहान रॉकेट ‘एसएसएलव्ही’चे हे तिसरे प्रक्षेपण आहे. यापूर्वी गेल्या दोन वर्षात दोनवेळा अशाप्रकारे प्रक्षेपण करण्यात आले होते. 9 ऑगस्ट 2022 रोजी झालेले पहिले प्रक्षेपण अयशस्वी झाले. त्यानंतर 9 फेब्रुवारी 2023 रोजी दुसऱ्या वेळी इस्रोचे शास्त्रज्ञ या मोहिमेत यशस्वी ठरले होते. दुसऱ्या प्रक्षेपणावेळी तीन उपग्रह अवकाशात पाठविण्यात आले होते. एसएलसएलव्ही विकसित करण्याचा उद्देश लहान उपग्रह प्रक्षेपित करणे हा आहे. यासोबतच, पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकलचा आतापर्यंत प्रक्षेपणात मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. एसएसएलव्ही 10 ते 500 किलो वजनाच्या वस्तू 500 किमी दूरच्या प्लॅनर ऑर्बिटमध्ये घेऊन जाऊ शकतात.









