वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) च्या संचालक मंडळाने भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) सोबत 10 वर्षांच्या सेवा कराराला मान्यता दिली आहे. एमटीएनएलच्या संचालक मंडळाने परदेशी उपकंपनी महानगर टेलिफोन (मॉरिशस) मधील शेअर्सच्या विक्रीसह इतर अनेक प्रस्तावांनाही मान्यता दिली आहे.
एमटीएनएलने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, त्यांच्या संचालक मंडळाने एमटीएनएल एसटीपीआय आयटी सर्व्हिसेस लिमिटेड किंवा एमएसआयटीएसमधील एमटीएनएलचे समभाग विकण्यास मान्यता दिली आहे. कंपनीने म्हटले आहे, संचालक मंडळाने बीएसएनएल आणि एमटीएनएलमधील सेवा करार 10 वर्षांच्या कालावधीसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा करार दूरसंचार विभाग/कंपनी व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या सेवा कराराच्या मान्यतेच्या अधीन आहे.









