वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या ‘अग्नी’ या क्षेपणास्त्राचे निर्माते आणि थोर शास्त्रज्ञ राम नारायण अग्रवाल यांचे निधन झाले आहे. गुरुवारी त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. तेलंगणा सरकारकडून त्यांना मानवंदना देण्यात आली आणि शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) मान्यवर संशोधक होते. अग्नी या भारताच्या दीर्घ पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राचे जनक म्हणून त्यांचा देशवासियांना परिचय होता. या क्षेपणास्त्राच्या प्रथम तीन आवृत्त्यांचे प्रारुप त्यांच्या संरचनेनुसार साकारण्यात आले होते. आता हे क्षेपणास्त्र भारताच्या संरक्षण सामग्रीचा एक महत्वाचा घटक म्हणून परिचित आहे. हे भारताने निर्माण केलेले प्रथमच स्वदेशी आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. याच संशोधन संस्थेकडून या क्षेपणास्त्राचे उत्पादनही संरक्षण विभागांच्या आवश्यकतेनुसार केले जात आहे.









