वृत्तसंस्था/ नैरोबी
भारताचा माजी अष्टपैलू दोड्डागणेश याची केनियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 2026 मधील टी-20 वर्ल्ड कप प्रवेशासाठी आफ्रिका विभागीय पात्रता स्पर्धा सुरू होण्याआधीच त्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
51 वर्षीय गणेशने 4 कसोटी व एका वनडेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पण त्याला फारसे यश मिळाले नव्हते. मात्र प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याने कर्नाटकटाचे प्रतिनिधित्व करताना 2000 हून अधिक धावा जमविल्या तर गोलंदाजीत 365 बळी टिपले. केनियन संघाला पुन्हा चांगले दिवस आणण्याची जबाबदारी त्यांना पेलावी लागणार आहे. केनिया संघाने 1996 ते 2011 या पाच वर्ल्ड कपमध्ये भाग घेतला होता. पण त्यानंतर या संघाची घसरणच झाल्याने त्यांना वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळविता आली नाही. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती, हीच त्यांची आजवरची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
आफ्रिका विभागीय स्पर्धेत त्यांना पापुआ न्यू गिनिया, कतर, डेन्मार्क, जर्सी यांच्याविरुद्ध सामने होतील. आयसीसी डिव्हिजन 2 चॅलेंज लीग स्पर्धा सप्टेंबरमध्ये तर टी-20 वर्ल्ड कप पात्रता स्पर्धा ऑक्टोबरमध्ये होणार आहे.









