प्रवाशांच्या सुरक्षेकरता उचलले पाऊल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रेल्वे मंत्रालयाने 52 वंदे भारत रेल्वेगाड्यांमध्ये अत्याधुनिक ‘कवच 4.0’ अँटी-कोलिजन सिस्टीम लावण्याचा निर्णय घेतला आहे. ही कवच सिस्टीम एक स्वदेशी स्वरुपात विकसित ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (एटीपी) तंत्रज्ञान आहे. भारतीय उद्योगाच्या सहकार्यातून रिसर्च डिझाइन आणि स्टँडर्ड्स ऑर्गनायजेशनकडून (आरडीएसओ) याचे डिजाइन करण्यात आले आहे. सद्यकाळात वंदे भारत रेल्वेगाड्यांमध्ये कवच 3.2 वर्जनचा वापर करण्यात येत आहे. लवकरच या यंत्रणेला 4.0 मध्ये अपग्रेड करण्यात येईल. या प्रक्रियेत काही वेळ लागणार असला तरीही हे काम युद्धपातळीवर केले जात असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
आतापर्यंत 1,645 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गावर कवच सिस्टीम स्थापित करण्यात आली आहे. तसेच 121 इंजिन्समध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. कवच 4.0 ला विविध कठिण भागांमध्ये यशस्वीपणे परीक्षण पार पडल्यावर रेल्वे मंत्रालयाने ते अधिक व्यापक स्वरुपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्वतीय क्षेत्र, सागरकिनारे, हिमवृष्टी होणारे भाग आणि घनदाट जंगलांमध्ये याचे परीक्षण यशस्वी ठरले असल्याने या तंत्रज्ञानाला मंजुरी देण्यात आली आहे. आरडीएसओकडून मंजुरी मिळाल्यावर रेल्वे मंत्रालयाने आणखी दोन महत्त्वपूर्ण रेल्वेमार्गांवर ते स्थापित करण्याची योजना आखली आहे.
5 हजार किलोमीटरच्या रेल्वेमार्गावर कवच सिस्टीम तैनात करण्याचे आणि मार्च 2025 पर्यंत 9 हजार किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गावर ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम स्थापित करण्याचे रेल्वे मंत्रालयाचे लक्ष्य आहे. भविष्यातील नव्या रेल्वेगाड्यांमध्sय कवच 4.0 पूर्वीपासूनच स्थापित असणार आहे. पहिल्या टप्प्यात हे तंत्रज्ञान 10 हजार इंजिन्समध्ये तैनात करण्यात येणार आहे.
जून महिन्यात झालेल्या कंचनजंगा रेल्वे दुर्घटनेनंतर या यंत्रणेची आवश्यकता प्रकर्षाने जाणवली होती. या दुर्घटनेत 11 जणांना जीव गमवावा लागला होता. तत्पूर्वी जून 2023 मध्ये ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या तीन रेल्वेंच्या दुर्घटनेत 293 जणांचा मृत्यू झाला होता. दोन्ही घटनांमध्ये कवच सिस्टीम सक्रीय नव्हती, यामुळे या दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती.









