शनिवारी होणाऱ्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
बेळगाव : महानगरपालिकेची सर्वसाधारण बैठक शनिवार दि. 17 रोजी सकाळी 11.30 वा. मनपाच्या सभागृहात होणार आहे. या बैठकीमध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांबरोबरच तुरमुरी येथील घनकचरा व्यवस्थापन येथे अग्निशमन यंत्रणा उभारण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. पंधराव्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे. त्यावरही चर्चा करण्यात येणार आहे. मनपा कौन्सिल विभागाने या बैठकीची विषयपत्रिका तयार केली आहे. मात्र विरोधी गटाचे नगरसेवक निधी वाटपावरून बैठकीलाच विरोध दर्शवत आहेत. त्यामुळे ही बैठक होणार की नाही? असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. नगरसेवकांना नोटिसा पाठवून दिल्यानंतर काही नगरसेवकांनी त्या नोटिसा घेतल्या नाहीत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत त्याबाबत कोणता निर्णय विरोधी व सत्ताधारी गट घेणार यावरच पुढील कृती समजणार आहे. दरम्यान महत्त्वाचे म्हणजे सत्ताधारी गटातील काही नगरसेवक नाराज आहेत. याचबरोबर विरोधी गटाच्या भूमिकेमुळे महापौर सविता कांबळे यांची चांगलीच गोची निर्माण होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये पाणीपुरवठा, पथदीप, अनगोळ येथील विविध समस्या, यासह इतर विषयांवर चर्चा केली जाणार आहे. मात्र विरोधी गट नेमकी कोणती भूमिका घेणार यावरच बैठकीचे भवितव्य अवलंबून आहे.









