कॅम्प मुख्य पोस्ट कार्यालयातील प्रकार
बेळगाव : कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात सर्व्हरडाऊनमुळे सर्व सेवा कोलमडल्या होत्या. मंगळवारी सकाळपासून सर्व्हर नसल्यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना पुन्हा माघारी फिरावे लागले. सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण असल्याने दुपारपर्यंत सर्व्हरडाऊनची समस्या जाणवली. आरडी, फिक्स डिपॉझिट, सुकन्या समृद्धी, पीपीएफ यासह इतर सेवांसाठी सर्व्हरची आवश्यकता असते. परंतु कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात मंगळवारी सकाळपासून सर्व्हरडाऊन होता. नवीन महिन्याला नुकतीच सुरुवात झाल्याने नवीन खाते उघडणे यासह इतर सेवांसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यात गुरुवारी स्वातंत्र्यदिनाची सुटी असल्याने काम संपविण्यासाठी ग्राहक गर्दी करीत होते. परंतु सर्व्हर नसल्याने त्यांना पुन्हा माघारी फिरावे लागले. यासंदर्भात बेळगावचे पोस्ट अधीक्षक विजय वडोनी यांच्याशी संपर्क साधला असता, सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून दुपारनंतर सर्व सेवा पूर्ववत होतील, अशी माहिती त्यांनी दिली.









