अयोध्यानगर, संगमेश्वरनगर रस्ता उखडून धुळीचे साम्राज्य : साफसफाई करण्याची मागणी
बेळगाव : अयोध्यानगर, नेहरुनगर ते संगमेश्वरनगर क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे चार महिन्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. पहिल्याच पावसात रस्त्याची धूळदाण झाली आहे. रस्ता उखडल्याने रस्त्यावर बारीक चिपिंग विखुरली असून वाहनांच्या रहदारीमुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याचा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील महत्त्वाच्या रहदारी रस्त्यांमध्ये समावेश असणाऱ्या एपीएमसी ते अयोध्यानगर रस्त्याचे गेल्या मे महिन्या दरम्यान डांबरीकरण करण्यात आले आहे. संगेमश्वरनगर क्रॉस ते अयोध्यानगरपर्यंतच्या रस्त्याचे दुतर्फा डांबरीकरण करण्यात आले आहे. केवळ चार महिन्याच्या कालावधीतच रस्त्याची पार दूरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यावरील डांबर उखडून खडी विखुरली आहे. यामुळे रस्त्यावर अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे.
तर ठिकठिकाणी खड्डे निर्माण होऊन रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण करण्यात आल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप वाहनधारकांतून केला जात आहे. बेळगाव शहराचा स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून विकास साधण्यात येत असला तरी शहरातील रस्ते मात्र स्मार्ट झालेले दिसून येत नाही. निकृष्ट दर्जाची विकासकामे राबवून अधिकारी व ठेकेदार मलिदा लाटून स्मार्ट बनत असल्याचा आरोप शहरवासियांतून केला जात आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. या रस्त्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे रस्ता धुळीने माखला आहे. वाहनांच्या रहदारीमुळे रस्त्याकडेच्या व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये धूळ माखत असल्याने मनपाच्या अनागोंदी कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मनपाने याकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्यावरील धूळ दूर करण्यासाठी साफसफाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.









