वृत्तसंस्था/टोरँटो
एटीपी आणि डब्ल्युटीए टूरवरील येथे खेळविण्यात आलेल्या नॅशनल बँक खुल्या पुरूष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेची जेसीका पेगुला तसेच ऑस्ट्रेलियाचा अॅलेक्सी पॉपिरीन यांनी एकेरीची अजिंक्यपदे पटकाविली.
पुरुष एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात 62 व्या मानांकित पॉपिरीनने रशियाच्या पाचव्या मानांकित आंद्रे रुब्लेवचा 6-2, 6-4 अशा सरळ सेटसमध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. पॉपिरीनने आतापर्यंत एटीपी टूरवरील दोन स्पर्धा जिंकल्या आहेत. गेल्या आठवडाभराच्या कालावधीत पॉपिरीनने एटीपी मानांकनांतील पहिल्या 20 टेनिसपटूंमधील पाच टेनिसपटूंचा पराभव केला. या स्पर्धेत त्याने 11 वा मानांकित शेल्टनचा, सातवा मानांकित डिमीट्रोव्हचा, चौथा मानांकित हुरकेज त्यानंतर अमेरिकेच्या कोर्दाचा पराभव केला. या कामगिरीमुळे पॉपिरीनने एटीपीच्या ताज्या मानांकनात 62 व्या स्थानावरुन 23 व्या स्थानावर झेप घेतली आहे.
महिलांच्या एकेरीतील अंतिम सामन्यात अमेरिकेच्या तृतिय मानांकित जेसीका पेगुलाने अमंदा अॅनीसिमोव्हाचा 6-3, 2-6, 6-1 असा पराभव केला. अमेरिकेच्या अॅनिसिमोव्हाने या अंतिम सामन्यात पेगुलाला विजयासाठी चांगलेच झुंजविले. पेगुलाने आतापर्यंत डब्ल्युटीए टूरवरील सहा स्पर्धा जिंकल्या आहेत. डब्ल्युटीए टूरवरील ताज्या मानांकनात पेगुला 6 व्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत अमेरिकेच्या कॅरोलिनी डुलहेडी आणि क्रॉझेक यांनी महिला दुहेरीचे जेतेपद मिळविताना कॅनडाची डेब्रोव्हेस्की आणि न्यूझीलंडची रुटलिप यांचा 7-6(7-2), 3-6, 10-7 असा पराभव केला.









