राजस्थान उच्च न्यायालयाकडून दिलासा
वृत्तसंस्था/ जयपूर
लैंगिक शोषणाप्रकरणी आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम यांना राजस्थान उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने उपचारासाठी आसाराम यांना 7 दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. आसाराम आता पोलिसांच्या देखरेखीत उपचारासाठी महाराष्ट्रात दाखल होणार आहेत.
न्यायाधीश पुष्पेंद्र सिंह भाटी यांच्या खंडपीठाने त्यांना अंतरिम पॅरोल मंजूर केला आहे. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम यांची प्रकृती यापूर्वी अचानक बिघडली होती. यानंतर तुरुंग प्रशासनाने त्यांना जोधपूर एम्समध्ये दाखल केले होते. आसाराम हे रुग्णालयात दाखल असल्याचे कळताच त्यांच्या समर्थकांनी तेथील परिसरात मोठी गर्दी केली होती. आसाराम यांना 2018 साली जोधपूरच्या एका विशेष पॉस्को न्यायालयाने अल्पवयीनावर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. आसाराम हे 2 सप्टेंबर 2013 पासून तुरुंगात आहेत.









