दहशतवाद्यांना सीमा पार करण्यास केली होती मदत : अन्न-निवारा पुरविण्याचे कृत्य
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीरच्या कथुआमध्ये पोलिसांनी 8 ओव्हरग्राउंड वर्कर्सना अटक केली आहे. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी मॉड्यूलच्या या वर्कर्सनी 3 दहशतवाद्यांना मदत केली होती. हे दहशतवादी नंतर डोडा येथे झालेल्या चकमकीत मारले गेले होते.
या ओव्हर ग्राउंड वर्कर्सनी दहशतवाद्यांना सीमा पार केल्यावर डोडाचे जंगल तसेच पर्वतांपर्यंत पोहोचण्यास मदत केली होती. तसेच त्यांना अन्न आणि राहण्यासाठी जागा पुरविली होती. दहशतवादी मॉड्यूलचे हे हस्तक पाकिस्तानातील जैशच्या हँडलर्सच्या संपर्कात होते. 26 जून रोजीच्या चकमकीनंतर केंद्रीय यंत्रणांनी पोलिसांना हे ओव्हर ग्राउंड वर्कर्स गंडोह येथे लपल्याची माहिती दिली होती.
इनपूट मिळाल्यावर गंडोहमध्ये 50 हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली होती. पुरावे मिळाल्यावर आणि चौकशीत दहशतवाद्यांना मदत केल्याची बाब मान्य केल्यानंतर 8 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या दहशतवादी मॉड्यूलचा म्होरख्या मोहम्मद लतीफ होता. तो कथुआच्या अम्बे नाल भागातील रहिवासी होता. जैश दहशतवाद्यांच्या हँडलर्सच्या वतीने लतीफच प्रामुख्याने संपर्क करत होता. दहशतवाद्यांच्या नेटवर्कमध्ये कुणाला सामील करायचे याचा निर्णय लतीफच घेत होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये लतीफसोबत अख्तर अली, सद्दाम कुशल, नूरानी, मकबूल, लियाकत आणि कासिम यांचा समावेश असून ते सर्वजण कथुआचेच रहिवासी आहेत.
तर दुसरीकडे जम्मू-काश्मीर पोलिसांनी गंडोह येथे आणखी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचा दावा समोर येत आहे. परंतु याची अद्याप अधिकृत पुष्टी होऊ शकलेली नाही. तर संबंधित ठिकाणी अद्याप शोधमोहीम सुरू असल्याचे सांगण्यात आले.









