एमपी-एटीजीएम असे नाव : डीआरडीओकडून निर्मिती
वृत्तसंस्था/पोखरण
डीआरडीओने राजस्थानच्या पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये स्वदेशी मॅन-पोर्टेबल रणगाडाभेदी क्षेपणास्त्राचे (एमएटीजीएम) मंगळवारी यशस्वी परीक्षण केले आहे. या परीक्षणाचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूचे रणगाडे आणि चिलखती वाहनांना नष्ट करू शकते.
आगामी काळात भारताचा मुख्य रणगाडा अर्जुनमध्ये हे क्षेपणास्त्र तैनात केले जाणार आहे. पोखरणच्या परीक्षणात एमपीएटीजीएमने पूर्ण अचुकतेसह लक्ष्याचा वेध घेतला आहे. या स्वदेशी रणगाडाभेदी क्षेपणास्त्रात टँडम हाय एक्स्प्लोसिव्ह अँटी-टँक (हीट) हत्यार असून ते अत्याधुनिक एक्सप्लोसिव्ह रिएक्टिव्ह आर्मर (ईआरए) कवचयुक्त चिलखती वाहनांना नष्ट करू शकते. सद्यकाळातील कुठलाही रणगाडा किंवा चिलखती वाहन या क्षेपणास्त्रापासून सुरक्षित राहू शकणार नाही.
या क्षेपणास्त्राची अनेक परीक्षणं झाली आहेत. या क्षेपणास्त्राचे वजन 14.50 किलोग्रॅम असून त्याची लांबी 4.3 फूट इतकी आहे. हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी दोन जणांची गरज भासते. या क्षेपणास्त्राचा मारक पल्ला 200 मीटरपासून 2.5 किलोमीटर इतका आहे. यात टँडम चार्ज हीट आणि पेनेट्रेशन वॉरहेड लावता येणार आहे. सैन्यात या क्षेपणास्त्राचा समावेश झाल्यावर फ्रान्सकडून प्राप्त मिलन-2टी आणि रशियात निर्मित कॉन्कर्स रणगाडाभेदी दिशानिर्देशित क्षेपणास्त्रांच्या जुन्या वर्जनला हटविण्यात येणार आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) सातत्याने भारतीय सैन्याचे हात मजबूत करत आहे. हे क्षेपणास्त्र सैन्याच्या पायदळ आणि पॅराशूट दलासाठी निर्माण करण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र इजेक्शन मोटरचा वापर करत कॅनिस्टरद्वारे डागले जाऊ शकते. लक्ष्याचा अचूक भेद करण्यासाठी यात अत्याधुनिक आयआयआर सीकरचा वापर करण्यात आला आहे.









