उच्च न्यायालयाचा पोलिसांना दणका : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हा रद्द
बेळगाव : महाराष्ट्र राज्याच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिण्यात आल्यानंतर बेळगावमध्ये त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. त्यामुळे मार्केट पोलिसांनी म. ए. समितीच्या सहा जणांवर गुन्हा दाखल केला होता. याचबरोबर महाराष्ट्राचे बसचालक व वाहकावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याविरोधात धारवाड उच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. जय महाराष्ट्र म्हणणे किंवा त्याचे स्वागत करणे, हा गुन्हा नसून कार्यकर्त्यांवरील तो गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. महाराष्ट्र राज्य हे भारतातच आहे. त्यामुळे कोणत्याही राज्याचा जयजयकार करणे, हा गुन्हा ठरत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे पोलिसांना चांगलाच दणका बसला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ असा उल्लेख करण्यात आला होता. बेळगावमध्ये पहिली बस मध्यवर्ती बसस्थानकावर येताच जंगी स्वागत करण्यात आले होते. ॲड. अमर येळ्ळूरकर, सुनील बाळेकुंद्री, मेघन लंगरकांडे, मदन बामणे, सूरज कणबरकर, गणेश दड्डीकर यांनी स्वागत केले. त्यावेळी बसचालक प्रमोद गायकवाड, वाहक देविदास भोराट यांचा फेटा बांधून सत्कारदेखील करण्यात आला. त्यानंतर मार्केट पोलिसांनी या सर्वांवर दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी येथील जेएमएफसी न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती. मात्र विविध कारणांनी ती सुनावणी पुढे ढकलत होती. यामुळे ॲड. राम घोरपडे यांनी हा खटलाच रद्द करावा म्हणून या सर्वांच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याठिकाणी न्यायालयाने महाराष्ट्र राज्य हे भारतात आहे. कोणत्याही राज्याचा जयजयकार करणे हा गुन्हा ठरत नसल्याचे स्पष्ट करत हा गुन्हाच रद्द केला आहे. यामुळे पोलिसांना मोठा दणका बसला असून म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.
फी न घेता न्यायालयीन कामकाज
म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो गुन्हा रद्द करण्यासाठी ॲड. राम घोरपडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याठिकाणी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांची बाजू भक्कमपणे मांडली. न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून हा गुन्हाच रद्द केला आहे. कोणत्याही प्रकारची फी न घेता ॲड. घोरपडे यांनी काम पाहिल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
कॅम्प पोलीस स्थानकातील ‘तो’ गुन्हाही रद्द हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना दिलासा
बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान झाल्यानंतर येथील म. ए. समितीच्या व हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला होता. याप्रकरणी कॅम्प पोलिसांनी 53 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्याविरोधात धारवाड उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. त्या ठिकाणी न्यायालयाने तो गुन्हाच रद्द ठरविला आहे. बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान करण्यात आला होता. त्याचे पडसाद सर्वत्र उमटले होते. येथील कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी चौक येथे त्या घटनेचा निषेध नोंदविला. त्यानंतर कॅम्प पोलिसांनी 53 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. त्याविरोधात ॲड. राम घोरपडे यांनी उच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्यासाठी या सर्वांच्यावतीने याचिका दाखल केली. त्याठिकाणी या घटनेसंदर्भातील सर्व माहिती न्यायालयासमोर घोरपडे यांनी मांडली. न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून हा गुन्हाच रद्द ठरविला आहे. यापूर्वी मार्केट पोलिसांनी दाखल केलेला गुन्हादेखील रद्द ठरविण्यात आला आहे. त्यानंतर कॅम्प पोलीस स्थानकामधीलही गुन्हा रद्द ठरल्याने सर्व कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.









