चौकशीची मागणी, ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : देसूर ग्राम पंचायतीमध्ये राबविण्यात आलेल्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. देसूर ग्राम पंचायतीमध्ये गेल्या चार वर्षामध्ये अनेक विकासकामे राबविण्यात आली आहेत. मात्र या विकासकामांचा दर्जा निकृष्ट दर्जाचा असून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. दर्जाहिन विकासकामे राबविण्यात आली आहेत. याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. गावामध्ये गटारींच्या स्वच्छतेसाठी 4 लाख 72 हजार निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र अपेक्षेनुसार काम झालेले नाही.
ग्राम पंचायतीच्या निधी 2 अंतर्गत राबविलेल्या कामांची चौकशी करावी, तर ग्राम पंचायतीमध्ये घरांची नोंद करून सर्वे करण्यासाठी विकासनिधी घेतला जात आहे. मात्र नागरिकांना यासंदर्भातील पोचपावती दिली जात नाही. ग्राम पंचायत सदस्य गावामध्ये विकास निधी निश्चित केलेल्या पेक्षाही अधिक पैसे घेत आहेत, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. देसूर गावातील शिवाजी गल्लीमध्ये जलवाहिनी घालण्यात आली आहे. मात्र ही जलवाहिनी निकृष्ट दर्जाची आहे. तसेच स्मशानभूमी, पाईपलाईन व इतर विकासकामासाठी केलेल्या निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याची चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांतर्फे सादर करण्यात आले.









