पंतप्रधान सडक योजनेतून रस्ताही करून देणार असल्याचे आमदारांचे आश्वासन
वार्ताहर/नंदगड
केरवाड ग्रामपंचायत हद्दीतील अंजनेयनगर येथील रस्ता नादुरुस्त झाला असून विद्यार्थी चिखलातून वाट काढत शाळेला जात असल्याच्या परिस्थितीची बातमी शनिवारी प्रसिद्ध करण्यात आली होती. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी रविवारी संबंधित रस्त्याच्या ठिकाणी भेट देऊन अंजनेय नगरातील ग्रामस्थांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान सडक योजनेतून हा रस्ता करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच अंजनेयनगरमध्ये प्राथमिक शाळा लवकरच सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चाळीस वर्षांपूर्वी हिडकल डॅम धरणाच्या क्षेत्रातील गावांचे स्थलांतर खानापूर तालुक्याच्या काही भागात केले होते. त्यापैकीच सुरपूर, केरवाड (हिडकल) हे विस्थापितांचे नव्याने पुनर्वसन करण्यात आलेले गाव होय. या गावची शेती हिडकलपासून तीन किलोमीटर दूर असल्याने त्यातील 40 कुटुंबांनी शेतातच आपली घरे बांधली. या वस्तीला ‘अंजनेयनगर’ नाव देण्यात आले. ही चाळीस कुटुंबे अद्याप अनेक सुविधांपासून वंचित आहेत. त्यातील मुख्य म्हणजे दळणवळणासाठी रस्ताच करून दिलेला नाही. पावसाळ्यात या संपूर्ण तीन किलोमीटर रस्त्यात चिखल होत असतो.
रविवारी आमदार विठ्ठल हलगेकर, भाजपाचे नेते प्रमोद कोचेरी, भरमाणी पाटील यांच्यासह स्थानिक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भेट देवून तेथील जनतेकडून व विद्यार्थ्यांकडून समस्येची जाणीव करून घेतली. या लोकांचे हाल पाहता पंतप्रधान सडक योजनेतून या ठिकाणी लवकरच रस्ता करून दिला जाणार आहे. शिवाय अंजनेयनगरमध्ये प्राथमिक शाळा सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले.









