विश्वहिंदू परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या राजीनाम्यानंतर त्या देशामध्ये अराजकता निर्माण झाली आहे. यामुळे तेथील कट्टर पंथीयांकडून हिंदू धर्मीयांना लक्ष्य केले जात आहे. हिंदू धर्मीयांच्या घरांची जाळपोळ करून मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहेत. तर हिंदू नागरिकांवर अन्याय, अत्याचार केला जात आहे. तेथील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. यासाठी केंद्र सरकारने त्वरित हिंदूच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, जागतिक संघटनेच्या माध्यमातून दबाव घालण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन विश्वहिंदू परिषदेतर्फे पंतप्रधानाच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
बांगलादेशामध्ये हिंदू समाज अल्पसंख्याक म्हणून ओळखला जातो. देशाच्या फाळणीदरम्यान 32 टक्के हिंदूंची संख्या होती. मात्र ती आता 8 टक्क्यांवर आली आहे. तेथील कट्टरपंथीयांकडून अल्पसंख्याकांवर अमानवी अत्याचार केला जात आहे. त्यामुळे तेथील हिंदू अल्पसंख्याक होत आहेत. तेथे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे पंतप्रधान शेख हसीना यांना पायउतार व्हावे लागले आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन सुरू असताना यामध्ये कट्टरपंथीयांकडून हिंदू धर्मीयांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील हिंदू बांधवांच्या व्यापारी गाळ्यांसह मंदिरावर हल्ले करण्यात आले आहेत. घरांची जाळपोळ करण्यात आली आहे. वृद्ध महिलांवर अत्याचार करण्यात येत आहे. याचा विश्वहिंदू परिषदेकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. भारत सरकारने अल्पसंख्याक हिंदूच्या संरक्षणासाठी त्वरित पावले उचलावेत, अशी मागणी करण्यात आली. बांगलादेशामध्ये लोकनियुक्त व निधर्मी सरकार स्थापन व्हावे. अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याबरोबर त्यांचे हक्क मिळवून देण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली.









