खानापुरात हिंदू संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन
खानापूर : बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदू धर्मियावर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार दि. 12 रोजी तालुक्यातील हिंदू संघटना आणि भाजपच्यावतीने मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. येथील महालक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. यात हिंदू संघटनेचे कार्यकर्ते, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भगवेध्वज घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चात बांगलोदशाच्या विरोधात घोषणा देण्यात येत होत्या. तसेच मोर्चा शिवस्मारक चौकात आल्यानंतर गोल साखळी पद्धतीने आंदोलन करुन घोषणा देण्यात आल्या. यानंतर मोर्चा तहसीलदार कार्यालयाकडे नेण्यात आला. यावेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष पंडित ओगले यांनी बांगलादेशात हिंदूवर होत असलेला अन्याय त्वरित थांबविण्यात यावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर भूमिका घेऊन बांगलादेशातील हिंदूवरील अन्याय थांबविण्यासाठी योग्य पावले उचलावीत असे ते म्हणाले.
प्रमोद कोचेरी म्हणाले, हिंदू धर्मियावरील अत्याचाऱ्याबाबत सर्वांनी एकत्र येऊन हिंदू धर्मियावर होणाऱ्या अन्यायाबाबत आवाज उठविला पाहिजे. यासाठी भारत सरकारने तातडीने क्रम घेणे गरजेचे आहे. संजय कुबल म्हणाले, बांगलादेशात हिंदू होरपळत आहे. आम्ही भारतीयानी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. देशात मोदींसारखे कणखर नेतृत्व लाभले आहे. हेच आमचे भाग्य असून मोदी यांनी याबाबत कठोर क्रम घेऊन बांगलादेशातील हिंदूना न्याय द्यावा. यावेळी सुरेश देसाई, मल्लाप्पा मारीहाळ, राजेंद्र रायका, गुंडू तोपिनकट्टी यांची भाषणे झाली. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी निवेदनाचा स्वीकार करुन निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजप कार्यकर्ते तसेच हिंदू संघटनेचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.









