केएलएस, हेरवाडकर उपविजेते
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे व एसकेई कन्नडा स्कूल आयोजित छत्रपती शिवाजी क्लस्टर टिळकवाडी, अनगोळ, शहापूर विभागाच्या शटल बॅडमिंटन स्पर्धेत मुलांमध्ये एमव्ही हेरवाडकर संघाने केएलएस संघाचा 2-1 तर मुलींमध्ये डीपी स्कूलने एमव्ही हेरवाडकरचा 2-0 असा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. ओरिएंटल स्कूलच्या तुकाराम सभागृहात आयोजित केलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन ओरिएंटल स्कूलच्या मुख्याध्यापिका अनुश्री व सहाय्यक शिक्षिका अलका सिल्व्हिया डिलीमा यांच्या उपस्थितीत मैदानाची पूजा करुन करण्यात आली. मुलांच्या विभागात 6 संघांनी तर मुलींच्या विभागात 5 संघांनी भाग घेतला होता. मुलांच्या विभागात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केएलएसने ओरिएंटल संघाचा 2-0 असा पराभव केला. पहिल्या एकेरीत अथर्वने ओरिएंटलच्या राजूचा 15-10, 15-10 अशा सेट्समध्ये पराभव केला. तर दुहेरीत अमोघ गनाचारी व अथर्व या जोडीने राजू व संजय या जोडीचा 15-7, 15-10 अशा सेट्समध्ये पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एमव्ही हेरवाडकरने गजाननराव भातकांडे संघाचा 2-0 असा पराभव केला. एकेरीत शहापूरकरने भातकांडेच्या संकेतचा 15-4, 15-8 अशा सेट्समध्ये पराभव केला. दुहेरीत संकेत व अनुराग या जोडीने धीरज व आकाश या जोडीचा 15-3, 15-8 अशा सेट्समध्ये पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत एकेरीत शहापूरकरने चिरागचा 15-7, 15-9 असा पराभव केला. तर दुहेरीत संकेत व अनुराग यांनी अमोल गनाचारी व श्रेयस या जोडीचा 15-8, 9-15, 17-15 अशा अटीतटीच्या लढतीत पराभव करुन विजेतेपद पटकाविले.
मुलींच्या विभागात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात डीपी संघाने भातकांडे संघाचा 2-0 असा पराभव केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हेरवाडकरने केएलएसचा 2-0 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत एकेरीत डीपीच्या वंशिकाने किरणचा 15-11, 8-15, 15-10 अशा गुणफरकाने पराभव केला. तर दुहेरीत वंशिका व नाईशा या जोडीने किरण व श्रृतीका या जोडीचा 15-7, 9-15, 15-11 अशा सेट्समध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी सिल्व्हिया डिलीमा, उमेश मजुकर यांनी काम पाहिले. यावेळी प्रवीण पाटील, संतोष दळवी, एस. आर. हगीदाळे आदी उपस्थित होते.









