ब्लादिमीर पुतीन यांच्या प्रतिष्ठेला धक्का : 30 किलोमीटरपर्यंत आत शिरले युक्रेनचे सैनिक
वृत्तसंस्था/ कीव्ह/मॉस्को
अडीच वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धात युक्रेनच्या सैन्याने रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना मोठा झटका दिला आहे. युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या आत शिरून अनेक भूभागांवर ताबा मिळविला असल्याने रशियाचे संरक्षण मंत्रालय क्रेमलिन हादरून गेले आहे. युक्रेनचे सैन्य रशियाच्या क्षेत्रात 30 किलोमीटरपर्यंत आत शिरले आहे. रशियाच्या अनेक इमारतींवर युक्रेनचे सैनिक स्वत:च्या देशाचा ध्वज फडकवत आहेत. 
रशियाच्या वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांसाठी ही सर्वात अवघड स्थिती असून ते यातून बाहेर पडण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तर पुतीन यांच्यासाठी हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा ठरला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच एखाद्या देशाचे सैन्य रशियाच्या भूभागात दाखल झाले आहे.
तर दुसरीकडे युक्रेनला आता नाटो सदस्य देशांकडून एफ-16 लढाऊ विमाने प्राप्त झाली आहेत. यामुळे युक्रेनला आता स्वत:च्या हवाईक्षेत्राचे रक्षण करण्यास मदत होणार आहे. तसेच रशियात आणि क्रीमिया येथे थेट विध्वंसक हल्ले करता येणार आहेत.
रशियन सैन्याची कमकुवतपणा उघड
युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी अधिकृतपणे युक्रेनचे सैनिक रशियाच्या सीमेत दाखल झाल्याची पुष्टी दिली आहे. तर युव्रेनच्या सैनिकांसोबत टोलपिनो आणि ओब्श्ची कोलोदेज गावांनजीक चकमक झाल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. युक्रेन सैन्याच्या या अनपेक्षित पावलामुळे रशियाचे नेतृत्व हादरून गेले आहे. युक्रेनचे अधिकारी अनेक दिवसांपर्यंत या मोहिमेविषयी गुप्तता राखून होते, रशियाच्या आत शिरलेल्या युक्रेनियन सैनिकांची छायाचित्रे, व्हिडिओ आणि वृत्त अहवाल समोर आल्यावर त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. याच्या माध्यमातून युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या सैन्याचा कमकुवतपणा जगासमोर आणला आहे. रशियाला स्वत:च्या भूभागाचे रक्षण करणे देखील जमत नसल्याचा संदेश यामुळे गेला आहे.
पुतीन यांच्यासमोर संकट
पुतिन यांच्यासाठी धक्कादायक ठरलेल्या या युक्रेनच्या हल्ल्याला रोखण्यासाठी रशियात आता शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. रशियाच्या सैन्याने कुर्स्क आणि दोन अन्य सीमावर्ती क्षेत्रांमध्ये मोहीम हाती घेतली आहे. कुर्स्क येथून हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. युक्रेनने अनेकदा हवाईहल्ले करत रशियाच्या सीमवर्ती क्षेत्रांना लक्ष्य केले आहे, परंतु कुर्स्क ऑपरेशनद्वारे पहिल्यांदाच युक्रेनचे सैन्य रशियाच्या क्षेत्रात दाखल झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सहाव्या दिवशीही रशियाच्या सैन्याला युक्रेनच्या सैन्याला मागे लोटण्यास अपयश आले होते.
रशियात युक्रेनचा ध्वज
इंटरनेटवर युक्रेनकडून व्हायरल करण्यात आलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये युक्रेनचे सैन्य रशियाच्या गावांमध्ये सहजपणे फिरत असल्याचे दिसून येते. एका व्हिडिओत युक्रेनियन सैनिक स्वत:च्या देशाचा ध्वज एका इमारतीवर फडकवत असताना दिसून येतो. यादरम्यान युक्रेनियन सैनिक रशियाचा ध्वज जमिनीवर फेकत असल्याचे व्हिडिओत दिसून येते.









