2050 रुपये बनावट तर 2 लाख 60 हजारांच्या खऱ्या नोटा जप्त
बेळगाव : बनावट नोटा खपविण्याच्या प्रयत्नात असताना दोघा जणांना कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री गणेशपूर रोडवर ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून 500 च्या चार व 50 ची एक अशा पाच बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अनंत गुरुनाथ मायण्णा (वय 47, रा. वैजनाथ गल्ली, कडोली), विलास यशवंत पाटील (वय 53, रा. पाटील गल्ली, येळ्ळूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे असून हे दोघेही गवंडी काम करतात. कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी या जोडगोळीला अटक केली आहे.
गणेशपूर मेन रोड परिसरात बनावट नोटा खपविल्या जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून अनंत व विलास या दोघांना अटक केली. त्यांच्याजवळून 2050 रुपये किमतीच्या बनावट नोटा व 2 लाख 60 हजार रुपये खऱ्या चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याजवळून चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया लिहिलेल्या लहान मुलांच्या खेळणीतल्या नोटांही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शुक्रवारी रात्री या दोघा जणांवर भारतीय न्याय संहिता 179, 180, 318 (4), कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नागरिकांची फसवणूक करण्यासाठी हे दोघे जण चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटांचा वापर करत होते. या नोटा आपण गांधीनगर कोल्हापूर येथील एका बुक स्टॉलमधून खरेदी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
रियल इस्टेटसाठी बनावट नोटांचा वापर
पोलिसांनी अनंत व विलास यांची कसून चौकशी केली असता जमीन खरेदीसाठी चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटा दाखवून व्यवहार करीत होतो, अशी कबुली या दोघांनी दिली आहे. या नोटांची बंडले रियल इस्टेट व्यावसायिकांना दाखवून जमिनीचे व्यवहार करायचे. नंतर इतरांना ती जमीन विकून या व्यवहारातून पैसा मिळवायचा. या उद्देशाने चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटांचा वापर करीत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अटकेची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.









