पोलीस निरीक्षक एस. सीमानी : सरस्वती कॉलेजमध्ये व्यसनमुक्ती दिन
बेळगाव : अलीकडे मुले लहान वयातच व्यसनाधीन बनू लागली आहेत. तरुण पिढीही व्यसनाला बळी पडत आहे. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासाकडे लक्ष द्यावे. विद्यार्थी जीवनात व्यसनाच्या आहारी जाऊ नये, असा सल्ला शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी यांनी दिला. सरस्वती मुलींच्या पदवीपूर्व कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या व्यसनमुक्ती दिन व सायबर क्राईम जागृती कार्यक्रमात बोलताना त्यांनी वरील सल्ला दिला. इलकल येथील डॉ. महंत शिवयोगींचा जन्मदिन राज्यभरात व्यसनमुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.
समस्या असल्यास चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क साधा
एस. एस. सीमानी पुढे म्हणाले, इलकल महंत शिवयोगी यांचे व्यसनमुक्त समाजासाठी मोठे योगदान आहे. गावोगावी फिरून ते झोळी पसरवायचे. आपल्या झोळीत दक्षिणा नको, तुमचे व्यसन दान करा, व्यसनमुक्त जीवन जगा, असा संदेश ते द्यायचे. मुलांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये. आपल्या कोणत्याही समस्या असल्यास चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मोबाईलचा अतिवापर टाळा
सध्या तरुणाईत रिल्स बनविण्याचे वेड वाढले आहे. तेही एक व्यसन बनत चालले आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा. केवळ गरजेपुरतेच मोबाईल वापरावेत. अनोळखी फोन कॉल व मेसेजना प्रतिसाद देऊ नये. अनावश्यक येणाऱ्या लिंकवर क्लिक करू नये. आजच्या युगात गुन्हेगार अशिक्षित नाहीत. जास्त शिकलेलेच गुन्हेगारी जगात वावरत आहेत. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी बाळगण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मणीकंठ पुजारी, हवालदार नागराज ओसप्पगोळ आदी उपस्थित होते. प्रा. भीमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात अनुसूया हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. अनुपमा एन. व्ही. यांनी स्वागत केले. ज्योती मरेगुद्दी यांनी आभार मानले.









