बेळगाव : बेकिनकेरे ते कोवाड मार्गावर सीमाहद्दीवर पडलेल्या खड्ड्यांकडे रस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याने वर्गणी जमा करून खड्डे बुजविले आहेत. यासाठी बेकिनकेरे येथील काही युवकांनीच पुढाकार घेतला. या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे अपघातांना सामोरे जावे लागत होते. कित्येकवेळा तक्रारी करून देखील लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे याकडे दुर्लक्ष झाले होते. यासाठी काही युवकांनी एकत्र येत रस्त्यावरील खड्डे जेसीबीच्या सहाय्याने बुजविले आहेत. उचगाव-कोवाड मार्गावरील केवळ सीमाहद्दीत 500 मीटर रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. उचगाव ते बेकिनकेरे हा मार्ग सुरळीत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र हद्दीतही रस्ता व्यवस्थीत आहे. मात्र केवळ कर्नाटक हद्दीतील सीमेवर रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
त्यामुळे कोवाड, कागणी, नेसरी, होसूर आदी भागातील वाहनधारकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. रात्रीच्यावेळी लहानसहान अपघात घडू लागले आहेत. डोंगरपायथ्याशीच रस्ता असल्याने वन्यप्राण्यांचाही धोका आहे. त्यातच रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहने चालविणे धोकादायक ठरू लागले आहे. याबाबत कित्येकवेळा तक्रारी करून देखील रस्त्याची दुरूस्ती झाली नसल्याने काही युवकांनी पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत. मात्र या ठिकाणी रस्त्याची दुरूस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणीही होत आहे. शुक्रवारी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांकडूनही वर्गणी जमा करून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मिथुन डेंबले, नागेंद्र चिक्के, प्रथमेश बाळेकुंद्री, प्रविण सातेरी, सदाम बागवान, नीसार मुल्ला आदींचे सहकार्य लाभले.









