समोरील वाहन दिसत नसल्याने अपघातात वाढ : रहिवाशांसह व्यापाऱ्यांना फटका
बेळगाव : मागील महिन्याभरापासून रेल्वे उड्डाणपुलावरील खड्ड्यांनी हैराण झालेल्या बेळगावच्या नागरिकांना आता धुळीचा सामना करावा लागत आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलावर तर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून आसपासच्या परिसरातही धुळीचे थर साचत आहेत. यामुळे रहिवासी तसेच व्यापाऱ्यांमधूनही संताप व्यक्त होत असून उड्डाणपुलावरील डांबरीकरणाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेळगावमध्ये रोड शो झाला. त्यावेळी कपिलेश्वर उड्डाणपुलावरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. अवघ्या दोनच वर्षात उड्डाणपुलावरील रस्ता उखडून गेला असून खडी सर्वत्र पसरली आहे. यंदाच्या पावसात तर संपूर्ण खडी पावसाच्या पाण्यासोबत वाहून आली. ही खडी गुड्सशेड रोड या परिसरात साचली होती. यामुळे परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन ही खडी काढली. उड्डाणपुलावरही खडीचे ढीग साचले होते. यामुळे डांबरीकरणाबाबत स्थानिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पावसाळ्यात खडी साचल्याने उड्डाणपुलाच्या मध्यवर्ती भागात वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे प्रशासनाने मागील आठवड्यात ही सर्व खडी हटवली. परंतु, पावसाचा जोर कमी होताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. वाहने चालवताना धुळीमुळे समोरील वाहन दिसत नसल्याने अपघातही होत आहेत. परंतु, याकडे महानगरपालिका तसेच रेल्वे प्रशासन देखील लक्ष देण्यास तयार नाही. धुळीमुळे एका हाताने नाकावर हात ठेवून दुसऱ्या हाताने वाहने चालविण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.
व्यापाऱ्यांना सर्वाधिक त्रास…
कपिलेश्वर उड्डाण पूल परिसरात अनेक लहानमोठे उद्योग आहेत. मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने ही धूळ घरांसह दुकानांमध्येही शिरत आहे. परिसरातील भाजीविक्रेते, हॉटेल व्यावसायिक, स्वीटमार्ट, खाद्यपदार्थ विक्रेते या सर्वांनाच या धुळीचा सामना करावा लागत आहे. या धुळीमुळे व्यापार मंदावल्याची तक्रार व्यापारी करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.









