राजीव गौबा यांचे स्थान घेणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वरिष्ठ आयएएस अधिकारी टी.व्ही. सोमनाथन यांना कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सोमनाथन हे राजीव गौबा यांची जागा घेणार आहेत. गौबा यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ चालू महिन्यात पूर्ण होणार आहे. तामिळनाडू कॅडरचे 1987 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी सोमनाथन सध्या केंद्रीय वित्त सचिव आहेत.
तर गृह सचिव अजय कुमार भल्ला यांचा कार्यकाळ 22 ऑगस्ट रोजी पूर्ण होणार आहे. त्यांच्या जागी नव्या केंद्रीय गृह सचिवांची देखील केंद्र सरकार लवकरच नियुक्ती करु शकते. कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सोमनाथन यांना 30 ऑगस्ट 2024 पासून दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्त करण्यास मंजुरी दिली आहे.
नियुक्ती समितीने कॅबिनेट सचिवालयात ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) च्या स्वरुपात सोमनाथन यांच्या नियुक्तीलाही मंजुरी दिली आहे. या पदावर त्यांची नियुक्ती कार्यभार ग्रहण करण्याच्या तारखेपासून कॅबिनेट सचिवाचा पदभाव ग्रहण करण्यापर्यंतच असणार आहे.
सोमनाथन यांनी 2015-17 दरम्यान दोन वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत पंतप्रधान कार्यालयात संयुक्त सचिव आणि अतिरिक्त सचिव म्हणून काम केले आहे. सोमनाथन यांना एप्रिल 2021 मध्ये वित्त सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते. सोमनाथन हे चार्टड अकौंटंट देखील आहेत. हिंदी, इंग्रजी, तमिळ, प्रेंच, हौसा (आफ्रिकेच्या काही भागांमध्ये बोलली जाणारी) भाषा त्यांना अवगत आहे. अर्थशास्त्रात त्यांनी पीएचडी मिळविली आहे.









