वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारमध्ये माजी मंत्री राहिलेले संदीप वाल्मिकी यांनी शनिवारी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु केवळ 3 तासांतच भाजपमधून त्यांना काढून टाकण्यात आले आहे.
संदीप यांनी स्वत:वर झालेल्या गंभीर आरोपांशी संबंधित माहिती लपवून पक्षाची दिशाभूल केल्याचे म्हणत भाजपने त्यांची हकालपट्टी केली आहे. संदीप वाल्मिकी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, परंतु त्यांनी स्वत:ची पार्श्वभूमी लपविली होती. वस्तुस्थिती समोर येताच संदीप यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले असल्याची माहिती भाजप प्रदेश महामंत्री सुरेंद्र पूनिया यांच्याकडून एका पत्राद्वारे देण्यात आली आहे. संदीप हे मूळचे सोनिपतचे रहिवासी आहेत.
संदीप हे आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री होते. 2016 मध्ये रेशनकार्ड निर्माण करून देण्याप्रकरणी एका महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संदीप यांची मंत्रिपदावरून तसेच पक्षातून हकालपट्टी केली होती.









