प्रवाशांची संख्या रोडावल्याने अल्प प्रतिसाद : 1 ते 10 दुकान गाळ्यासाठी निविदा प्रक्रिया राबविणार
प्रतिनिधी/ बेळगाव
रेल्वे स्टेशनसमोरील कॅन्टोन्मेंट बसस्थानकातील दुकान गाळ्यांसाठी आठव्यांदा निविदा मागविण्यात आल्या आहेत. मागील सातवेळा निविदा मागवूनदेखील नागरिकांकडून योग्य प्रतिसाद मिळालेला नसल्याने कॅन्टोन्मेंट प्रशासनाने पुन्हा एकदा निविदा मागविल्या आहेत. 1 ते 10 दुकान गाळ्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत.
स्मार्ट सिटी अंतर्गत रेल्वे स्टेशनसमोरील कॅन्टोन्मेंट बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरण झाले, परंतु परिवहन मंडळाच्या बसची संख्या कमी झाल्याने प्रवाशांची संख्याही रोडावली. याठिकाणी बेळगाव तालुक्यातील ग्रामीण भागासह महाराष्ट्र व गोवा परिवहन मंडळाच्या बसदेखील येत होत्या. कर्ले, जानेवाडी, नंदिहळ्ळी, बिदरभावी या ग्रामीण भागासह पणजी, वास्को, फोंडा, म्हापसा, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, देवगड व राजापूर या बस याच रेल्वेस्थानकातून निघत होत्या. परंतु सध्या येथील मोजक्याच बस बसस्थानकातून निघत असल्यामुळे प्रवाशांची संख्या कमालीची कमी झाली.
19 ऑगस्टपूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डशी संपर्क साधा
बसस्थानकामध्ये एकूण 12 दुकानगाळे तयार करण्यात आले. 67.27 चौरस फूट रुंदीचे दुकानगाळे स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करण्यात आले. सुरुवातीला तब्बल 20 हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले होते. परंतु निविदा प्रक्रियेला कोणताच प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यानंतर या दुकानगाळ्याचे भाडे कमी करण्यात आले आहे. 1 ते 6 दुकान गाळ्यासाठी 3500 रुपये तर 7 ते 10 दुकानगाळ्यासाठी 5500 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. इच्छुकांनी 19 ऑगस्टपूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केवळ दोन दुकानगाळ्यांना प्रतिसाद
जुलै महिन्यात मागविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत केवळ दोघांनी अर्ज दाखल केले होते. त्यानुसार गाळा क्र. 11 व 12 संबंधितांना देण्यात आला आहे. आता उर्वरित 1 ते 10 दुकानगाळ्यांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावेळी तरी नागरिक प्रतिसाद देतील का? हे पहावे लागणार आहे.