रेपेचेजद्वारे कांस्य जिंकण्याची संधी
वृत्तसंस्था/ पॅरिस
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक मिळण्याची शक्यता आहे. शनिवारी झालेल्या महिलांच्या फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये 76 किलो वजनी गटात भारताच्या रितिका हुडाने बर्नाडेट नॅगीचा प्री-क्वार्टर फायनलमध्ये 12-2 असा पराभव केला. त्यानंतर झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये मात्र तिचा पराभव झाला. रितिकाचा पराभव झाला असला तरी तिला रेपचेजद्वारे कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे.
भारतीय कुस्तीपटू रितिका हुडाचा 76 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत किर्गिस्तानच्या मेडेट कैझी आयपेरीशी सामना झाला. या सामन्यातील पहिल्या फेरीत रितिकाने 1-0 ने आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या फेरीत रितिकाला टायमरमुळे 1 गुण गमवावा लागला. त्यामुळे सामना 1-1 असा बरोबरीत आला. दुसऱ्या फेरीच्या शेवटपर्यंत दोन्ही कुस्तीपटू एकही गुण मिळवू शकले नाहीत. त्यामुळे किर्गिस्तानच्या कुस्तीपटूला विजेती घोषित करण्यात आले. कारण कुस्तीचा सामना बरोबरीत सुटल्यास नंतर गुण मिळवणारा कुस्तीपटून विजेता ठरतो. याच पार्श्वभूमीवर किर्गिस्तानच्या आयपेरीला विजय घोषित करण्यात आले.
रेपचेजद्वारे पदक जिंकण्याची संधी
उपांत्यपूर्व फेरीतील पराभवानंतरही रितिकाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची संधी आहे. उपांत्यपूर्व फेरीत रितिकाला पराभूत करणाऱ्या कैझीने अंतिम फेरी गाठली तर, रितिकाला रेपेचेजमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळेल, जिथे भारतीय महिला कुस्तीपटूला कांस्यपदक जिंकण्याची संधी असेल. रेपेचेजमध्ये ते कुस्तीपटू सहभागी होतात, ज्यांना पराभूत करणारा कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे रितिकाला कांस्य पदक जिंकायचे असल्यास सलग दोन विजय मिळवावे लागतील.
तत्पूर्वी, रितिकाने तांत्रिक आघाडीच्या जोरावर शानदार विजय नोंदवून उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले होते. दोन वेळा युरोपियन चॅम्पियनशिप पदक विजेत्या हंगेरीच्या बर्नाडेट नागीचा 12-2 असा पराभव केला. भारतासाठी रितिका पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकाची अखेरची आशा आहे. इतर सर्व खेळातील भारताचे आव्हान संपुष्टात आले असून, रितिका रेपेचेजसाठी पात्र ठरल्यास ती स्पर्धेतील भारताची शेवटची स्पर्धक असेल.









