नेदरलँडची जलतरणपटू रुवेंडलची अनोखी कहाणी : पॅरिस ऑलिम्पिकमधील सुवर्ण आवडत्या डॉगला केले समर्पित
वृत्तसंस्था/ पॅरिस
नेदरलँड्सची जलतरणपटू शेरॉन व्हॅन रुवेंडलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. महिलांच्या 10 किमी मॅरेथॉन पोहण्यात रुवेंडलने सुवर्णपदक पटकावले. पदक जिंकल्यानंतर रुवेंडलच्या डोळ्यात अश्रू होते. खरं तर, रुवेंडलने हे पदक तिच्या कुत्र्याला समर्पित केले, ज्याचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. तिचा कुत्रा रिओ याच्यावर तिचे खूप प्रेम होते आणि तो गेल्यानंतर तिने आत्मविश्वास आणि प्रेरणा गमावली होती. मात्र, वडिलांच्या एका शब्दाने रुवेंडलचे मनोबल वाढले आणि तिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाण्याची प्रेरणा मिळाली. रुवेंडलच्या हातावर रिओचा टॅटू आहे. सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिने सर्वप्रथम टॅटूचे चुंबन घेतले. नेदरलँड्सच्या जलतरणपटूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
रिओ हा पोमेरेनियन जातीचा कुत्रा होता. 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने शानदार कामगिरीसह सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. रिओ ऑलिंपिकमधील शानदार कामगिरीनंतर रुवेंडलने आपल्या कुत्र्याचे नाव रिओ ठेवले होते. दरम्यान, यावर्षी मे महिन्यात रिओच्या फुफ्फुसांवर शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. कुत्र्याच्या मृत्यूनंतर रुवेंडलला मोठा धक्का बसला होता, याशिवाय तिने स्विमींगपासून काही काळ ब्रेक घेतला होता. अशा स्थितीत तिच्या वडिलांनी तिला रिओसाठी पुन्हा एकदा पोहण्याची प्रेरणा दिली. रुवेंडलने पॅरिस ऑलिंपिकमध्ये 10 किमी पोहण्याच्या शर्यतीत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तिने विक्रमी कामगिरीसह सुवर्ण जिंकण्याची किमया केली. यानंतर तिने माध्यमांशी संवाद साधला. रिओच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी मी त्याचा टॅटू काढला. ऑलिम्पिकमध्ये मी खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी केली. मी त्याच्यासाठी मनापासून पोहले व त्याच्यासाठी जिंकले, अशी प्रतिक्रिया तिने दिली. अर्थात, रुवेंडल व तिची संपूर्ण फॅमिली ही रिओचे दिवाणे आहेत. त्याच्या स्मृतीप्रत्यर्थ यांनी त्याचा लहान पुतळा देखील उभा केला असल्याचे तिने सांगितले.









