पृथ्वीवरील सगळी माणसे भूमीच्या पृष्ठभागावर रहात असल्याने त्यांना या पृष्ठभागाची बरीचशी माहिती आतापर्यंत झालेली आहे. मानवी प्रगतीच्या पुढच्या काळात त्याने विमानाचा आणि यानांचा शोध लावल्याने वरुन पृथ्वीचा पृष्ठभाग कसा दिसतो याचे ज्ञान झाले आहे. तथापि, पृथ्वीच्या पोटातील रहस्ये मात्र अद्यापही सगळी समजलेली नाहीत. त्यामुळे त्या संबंधातील नवनवे शोध आजही लागत असतात. वरुन पाहताना ज्या पृथ्वीवरील ज्या बाबी सहजसोप्या किंवा नेहमीच्याच भासतात त्या आत जाऊन पाहिल्यानंतर वेगळेच सत्य दाखवितात.
या संबंधातील एक इन्स्टाग्राम व्हिडीओ सध्या गाजत आहे. त्याला 1 कोटी हून अधिक दर्शक लाभले आहेत. या व्हिडीओत दोन व्यक्ती एका दरीत जाताना दिसतात. ही दरी त्यांना ते विमानातून प्रवास करीत असताना आढळली होती. आजवर तिच्याकडे त्यांचे लक्ष गेले नव्हते. म्हणून त्यांचा विमान प्रवास संपल्यावर त्यांनी ती दरी शोधून काढली आणि उत्सुकतेपोटी ते त्या दरीत शिरले. पण आत शिरल्यानंतर जे दृष्य त्यांना दिसले ते भयभीत करणारे होते.
दरीच्या अगदी तळाच्या भागात त्यांना हजारो वर्षे जुने महाकाय वृक्षांचे अवषेश दिसले. ते पाहून त्यांचा थरकाप उडाला. आजपर्यंत त्यांनी कधीच अशा मोठ्या झाडांचे अवशेष पाहिलेले नसल्याने त्यांच्यासाठी ते दृष्य नवे होते. त्यामुळे त्यांना अधिकच भीती वाटली. ही भुतेखेते तर नाहीत ना, अशी शंका त्यांच्या मनाला चाटून गेली. पण भीती चेपल्यानंतर ते या अवषेशांच्या जवळ गेले आणि त्यांनी त्यांचे चित्रीकरण केले. नंतर ते इन्स्टाग्रामवर टाकल्याने इतर असंख्य लोकांना या दरीची आणि दरीतील ऐतिहासिक ठेव्याची माहिती झाली. आता अनेक पुरातत्व तज्ञ या वृक्षावषेशांचा अभ्यास करणार आहेत. त्यातून गतकाळाविषयी नवी माहिती समोर येऊन आपल्या ज्ञानात भर पडण्याची शक्यता आहे.