बांगलादेशच्या स्थितीमुळे घाबरले पाकिस्तानचे सैन्य : असीम मुनीर यांचा इशारा
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
बांगलादेशातील अराजकतेच्या स्थितीमुळे पाकिस्तानचे सैन्य आणि तेथील सरकारही घाबरून गेले आहे. याचमुळे पाकिस्तानच्या सैन्यप्रमुखांनी रितसर वक्तव्य जारी करत नागरिकांना इशारा दिला आहे. बांगलादेशसारखी अराजकता पाकिस्तानात निर्माण करण्याचा विचारही करू नका असे असीम मुनीर यांनी म्हटले आहे.
जर कुणी पाकिस्तानात अशाप्रकारची अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला यशस्वी होऊ देणार नाही. या जगात कुठलीही शक्ती पाकिस्तानला नुकसान पोहाचवू शकत नाही, कारण हा देश जगाच्या अंतापर्यंत राहणार असल्याचे जनरल मुनीर यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी सैन्यप्रमुखांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर सुरू असलेल्या बांगलादेश आणि पाकिस्तानच्या स्थितीच्या तुलनेच्या पार्श्वभूमीवर समोर आले आहे.
कट्टरवाद संपविण्याचे आवाहन
सैन्यप्रमुख मुनीर यांनी मौलवींच्या एका संमेलनाला संबोधित केले. सैन्य देशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. मौलवींनी समाजात एकता आणि संयमाच्या भावनेला चालना द्यावी, कट्टरवाद आणि भेदभाव रोखण्यास मदत करावी. समाजाला आधुनिकतेच्या मार्गावर परत आणले जावे आणि जगातील भ्रष्ट आचरणाला नाकारण्यात यावे. सोशल मीडिया देशात अराजकतेला बळ पुरवित असल्याचा आरोप मुनीर यांनी केला आहे. इस्लामिक शरिया आणि घटनेच्या तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. पाकिस्तानने अफगाण शरणार्थींना समर्थन दिले आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत शांततापूर्ण संबंध निर्माण करावेत असे म्हणत मुनीर यांनी काश्मीरला भारत आणि पाकिस्तानमधील अपूर्ण अजेंडा असे संबोधिले आहे.









