तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष दिवंगत निंगोजी हुद्दार यांना श्रद्धांजली
बेळगाव : तालुका म. ए. समिती बळकट करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे तसेच प्रत्येक लढ्यामध्ये अग्रभागी राहणारे म. ए. समितीचे खंदे नेतृत्व हरपले, अशा शब्दात तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष निंगोजी हुद्दार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गुरुवारी दुपारी मराठा मंदिर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. गेली अनेक वर्षे निंगोजी हुद्दार यांनी तालुका म. ए. समितीची धुरा सांभाळली होती. कणखर आवाजात भाषण करणारे तसेच सर्वांना सामावून घेऊन पुढे जाणाऱ्या निंगोजी हुद्दार यांच्या निधनामुळे तालुका म. ए. समिती, शेका पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे, असे मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी सांगितले. त्यानंतर मनोज पावशे, प्रकाश अष्टेकर यासह इतर मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले.
निंगोजी हुद्दार कोणतेही आंदोलन असो, त्या ठिकाणी जोरदार भाषण करून कार्यकर्त्यांना जागरुक करण्याचा प्रयत्न करीत असत. ते कधीच मागे हटले नाहीत. सीमाप्रश्न सुटावा, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या निधनामुळे त्यांची ही अपेक्षा अपूर्ण राहिली. सीमाप्रश्न सोडवून आम्ही सारेच त्यांना श्रद्धांजली वाहू, असे काही नेत्यांनी विचार व्यक्त केले. शोकसभेच्या व्यासपीठावर तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, चिटणीस अॅड. एम.जी. पाटील, आबासाहेब दळवी होते. शोकसभेमध्ये कृष्णा हुंदरे, रामचंद्र मोदगेकर, अॅड. सुधीर चव्हाण, आर. एम. चौगुले, विलास घाडी यांच्यासह कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली. या शोकसभेला येळ्ळूरचे ग्रा. पं. माजी अध्यक्ष सतीश पाटील, महेश जुवेकर, तालुका पंचायत माजी सदस्य रावजी पाटील, शांताराम कुगजी, येळ्ळूर ग्रा. पं. उपाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्यासह म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.









