वृत्तसंस्था /पॅरिस
कुस्तीपटू विनेश फोगाट वजन जास्त झाल्याने अपात्र ठरलेली असताना कुस्तीपटू अंतिम पांघल आणि तिच्या संपूर्ण टीमला शिस्तीच्या उल्लंघनाबद्दल पॅरिसमधून हद्दपारीला तेंड द्यावे लागले आहे. या तऊण कुस्तीपटूने तिचे अधिकृत मान्यतापत्र तिच्या बहिणीला दिले होते, जिला ऑलिम्पिक ग्राम सोडताना सुरक्षा व्यवस्थेने पकडले. महिलांच्या 53 किलो वजनी गटात पांघल सुरुवातीचा सामना गमावल्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. फ्रेंच अधिकाऱ्यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) निदर्शनास शिस्तीचे उल्लंघन आणून दिल्यानंतर कुस्तीपटू अंतिम आणि तिच्या साहाय्यक कर्मचाऱ्यांना परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे भारतीय संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे. मात्र ‘आयओए’ने शिस्तभंगाचे नेमके स्वरुप काय हे सांगितलेले नसून एका सूत्राने त्यासंदर्भातील तपशील सांगितला.
तीन वर्षांची बंदी घातली जाण्याची शक्यता
दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक दलाला नामुष्कीच्या परिस्थितीत टाकलेल्या अंतिम पांघलवर ‘आयओए’कडून तीन वर्षांची बंदी घातली जाण्याची शक्यता आहे, असे सूत्राने सांगितले. ‘आयओए’च्या (भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन) अधिकाऱ्यांनी या मुद्यावर चर्चा केली आहे. या प्रकाराने सर्वांचीच स्थिती लाजिरवाणी करून टाकली आहे. प्रशिक्षकांसह यात सहभागी असलेल्या प्रत्येकावर तीन वर्षांची बंदी घालण्याचा विचार संघटना करत आहे’, असे भारतीय दलातील एका सूत्राने सांगितले. अंतिम भारतात पोहोचल्यानंतरच निर्णय जाहीर केला जाईल, असे सूत्राने स्पष्ट केले.









