शेख हसीना यांना ब्रिटनमध्ये आश्रय मिळण्याची शक्यता
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
बांगलादेशात उलथापालथ घडली असून तेथील माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात धाव घ्यावी लागली आहे. शेख हसीना या सध्या भारतात असल्या तरी त्या ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय मागत असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या भविष्यातील योजनेबद्दल गूढ कायम आहे. याचदरम्यान विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशातील घडामोडींसंबंधी ब्रिटनचे विदेशमंत्री डेव्हिड लॅमी यांच्याशी चर्चा केली आहे. जयशंकर आणि लॅमी यांनी बांगलादेश तसेच पश्चिम आशियातील घडामोडींवर चर्चा केली असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले आहे. बांगलादेशच्या लोकांच्या हिताला आमचे प्राधान्य आहे. बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यांची माहिती आमच्याकडे असून याप्रकरणी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. तेथे कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित होइपर्यंत आमची चिंता कायम असणार आहे. सर्व नागरिकांचे कल्याण आणि कायदा-सुव्यवस्था ही सरकारची जबाबदारी आहे. हे बांगलादेश आणि पूर्ण क्षेत्राच्या हिताचे असल्याचे भारताच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
बांगलादेशातील गुंतवणूक धोक्यात?
विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते जायसवाल यांना बांगलादेशातील भारतीय गुंतवणूक धोक्यात आली आहे का तसेच अमेरिका किंवा चीन बंगालच्या उपसागरात भारताच्या एकाधिकाराला प्रभावित करू शकतात का असे प्रश्न विचारण्यात आले. बांगलादेशचे घनिष्ठ मित्र म्हणून आम्ही ढाका येथील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहोत. बांगलादेशात शांतता आणि स्थिरता निर्माण व्हावी, जेणेकरून तेथील जनजीवन सुरळीत होईल अशी आमची इच्छा असल्याचे जायसवाल यांनी उत्तरादाखल सांगितले आहे.
बांगलादेशातून 19 हजार विद्यार्थी परतले
आतापर्यंत बांगलादेशातून 19 हजार विद्यार्थी परतले आहेत. भारतीय नागरिक बांगलादेशातून परत येऊ इच्छित असल्याने दूतावास त्यांना मदत करत आहे. बांगलादेशातील स्थितीत सुधारणा होईल आणि अन्य लोक परत येऊ शकतील अशी अपेक्षा असल्याचे जायसवाल यांनी नमूद केले आहे.









