आसनावरून उठत निघून गेले धनखड : विनेश फोगटच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गोंधळ
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
विनेश फोगटला ऑलिम्पिकमध्ये पदक न मिळविता आल्याने गुरुवारी राज्यसभेत जोरदार गोंधळ झाला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत यासंबंधी मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु सभापती जगदीप धनखड यांनी याची अनुमती दिली नाही. यानंतर तृणमूल खासदार डेरेक ओब्रायन यांनी या मुद्द्यावरून आरडाओरड करण्यास सुरुवात केली असता सभापती धनखड यांनी त्यांना इशारा दिला, ओब्रायन यांनी हे कृत्य पुन्हा केले तर सभागृहाबाहेरचा रस्ता दाखविला जाईल असे धनखड यांनी म्हटले. तर विरोधकांच्या वर्तनामुळे उपराष्ट्रपती व्यथित झाले.
पूर्ण देश विनेशसोबत घडलेल्या प्रकारामुळे दु:खी आहे. या मुद्द्यावर राजकारण करू नका. पदकविजेत्याला जे मिळावे ते सर्वकाही विनेशला देण्यात येणार आहे. आम्ही तिला पूर्ण सहाय्य करू. परंतु विरोधी पक्षांनी या प्रकरणी राजकारण करू नये असा आग्रह असल्याचे सभापतींनी म्हणताच काँग्रेस, तृणमूल तसेच अन्य विरोधी पक्षांनी सभात्याग केला. या प्रकारामुळे सभापती धनखड नाराज झाले. या पवित्र सभागृहाला अराजकतेचे केंद्र करणे, भारतीय लोकशाहीवर आघात करणे, अध्यक्षांच्या प्रतिमेला मलीन करणे, शारीरिक स्वरुपात आव्हानात्मक वातावरण निर्माण करणे हे केवळ अमर्यादित वर्तन नसून सर्व मर्यादा ओलांडणारे वर्तन असल्याचे धनखड यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांना सुनावले.
हे सभागृह सध्या देशातील सत्तारुढ पक्षाच्या अध्यक्षालाही येथे पाहत आहे, तसेच विरोधी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची उपस्थितीही पाहत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या देखील याच सभागृहाच्या सदस्य आहेत. अलिकडच्या दिवसांमध्ये ज्याप्रकारे आव्हानात्मक शब्दांद्वारे, पत्राच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून किती चुकीच्या टिप्पणी करण्यात आल्या हे मी पाहिले आहे. हा प्रकार मला आव्हान देणारा नसून सभापती पदाला हे आव्हान दिले जात आहे. या पदावर बसलेला व्यक्ती पात्र नसल्याचे या लोकांचे मानणे असल्यानेच हे आव्हान देण्यात येत असल्याचा आरोप सभापती धनखड यांनी केला आहे.
सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवू नका
सभागृहाच्या प्रतिष्ठेला सदस्यांनी धक्का पोहोचवू नये, बेताल वागू नका, जयराम रमेश हसू नका, तुमची सवय मला माहित आहे, काही खासदार चुकीची टिप्पणी करतात. सभागृहाकडून अपेक्षित असलेले सहकार्य मला मिळालेले नाही. मी माझ्या प्रयत्नांमध्ये कुठलीच कमतरता ठेवलेली नाही. आता माझ्यासमोर एकच पर्याय आहे. मी माझ्या शपथेपासून पळ काढणार नाही. मी आज ज काही अनुभवले, सदस्याने ज्याप्रकारे वर्तन पेले ते पाहता काही काळासाठी सभापती पदाच्या आसनावर बसण्यास मी स्वत:ला सक्षम मानत नसल्याचे म्हणत धनखड यांनी तेथून निघून जाणे पसंत केले. त्यानंतर उपसभापती हरिवंश यांनी सभागृहाच्या कामकाजाच संचालन केले.
नड्डाकडून विरोधी पक्ष लक्ष्य
पूर्ण देश विनेश फोगटसोबत आहे. पंतप्रधानांनी बुधवारीच तिला ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ संबोधिले आहे. पंतप्रधानांचा आवाज हा 140 कोटी लोकांचा आवाज आहे. विरोधी पक्षांकडे कुठलाच ठोस मुद्दा नसल्याने ते याप्रकरणी राजकारण करू पाहत आहेत. भारत सरकार, क्रीडा मंत्रालय आणि आयओसीने सर्व व्यासपीठांवर विनेट फोगटच्या प्रकरणी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असल्याचे केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी म्हटले आहे.









