नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनूस यांची अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती
हिंसाचार सुरुच. अवामी लीगच्या 29 नेत्यांचे सापडले मृतदेह, हिंदूंवरचे हल्लासत्र थांबेना,
वृत्तसंस्था / ढाका
बांगलादेशच्या नेत्या शेख हसीना यांच्या पलायनानंरही तेथील भीषण हिंसाचार सुरुच आहे. गेल्या 48 तासांमध्ये 200 हून अधिक नागरिकांनी प्राण गमावले आहेत. हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाच्या नेत्यांना वेचून ठार केले जात असून आतापर्यंत या पक्षाच्या 29 नेत्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. देशामध्ये अंतरिम सरकारची स्थापना तातडीने करण्यात आली असून नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनूस यांची अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे.
बांगलादेशच्या हिंसाचारात हिंदूच्या असंख्य घरांना आगी लावण्यात येत आहे. 47 शहरे आणि अनेक खेड्यांमध्ये हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. बांगलादेशचा लोकप्रिय हिंदू गायक राहुल आनंदा याचे 140 वर्षांचे जुने निवासस्थान जाळून राख करण्यात आले आहे. सध्या त्या देशात निर्नायकी स्थिती असल्याने धर्मांधांवर नियंत्रण ठेवण्याचे धाडस कोणाचेही होत नाही. बरीचशी पोलिस स्थानके ओस पडली आहेत. 40 पोलिस स्थानकांना आगी लावण्यात आल्या आहेत. किमान 100 हिंदूंशी हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. हिंदू महिलांवरही धर्मांध दंगलखोरांकडून अत्याचार केला जात असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
हसीनांना परत पाठवा
भारतात आलेल्या शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठविण्यात यावे, असा आदेश बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर निर्णय देताना दिला आहे. बांगलादेशात हसीना यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे त्यांना त्वरित परत पाठविण्यात यावे, असे त्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. भारताने त्यावर अद्याप आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. तसेच हसीना भारतात आश्रय घेणार की अन्यत्र कोणत्या देशात जाणार हे देखील स्पष्ट झालेले नाही.
मंदिरांवर हल्ले
बांगलादेशात हिंदूंची मंदिरेही धर्मांधांची शिकार ठरत आहेत. आतापर्यंत 200 मंदिरांची नासधूस करण्यात आली असून काही पुजाऱ्यांनाही गंभीर जखमी करण्यात आले आहे. सध्याच्या अस्थिर आणि हिंसापूर्ण वातावरणाचा गैरफायदा धर्मांधांकडून घेण्यात येत असून त्यांनी हिंदूंवर सूड उगविण्याचा चंग बांधला आहे.
शांतता राखण्याचे आवाहन
अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी आंदोलक आणि दंगलखोरांना हिंसा थांबविण्याचे आवाहन केले असून अल्पसंख्याकांना सुरक्षा दिली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच बांगला देशात येत्या तीन महिन्यांमध्ये संसदेची निवडणूक घेण्यात येईल, अशीही स्पष्टोक्ती त्यांनी केली. सध्याच्या घडामोडींमुळे देशातील लोकशाहीची हानी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे प्रतिपादनही केले.
अनेक भारतीय परतले
बांगलादेशात व्यवसाय किंवा पर्यटनासाठी गेलेले अनेक भारतीय नागरिक सुखरुप परतले आहेत. त्यांची संख्या साधारण 400 इतकी आहे. अद्यापही काही विद्यार्थी आणि पर्यटक या देशात असून त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी तेथील भारतीय उच्चायोग कार्यालये प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत कोणत्याही भारतीय नागरिकाचा तेथे मृत्यू झाल्याचे वृत्त नाही, असे स्पष्ट करण्यात आले.









