चिपळूण : दाभोळखाडीत चढा दर असलेल्या रेणवी, तांबोशीसह वेगवेगळया प्रकारची मासळी मुबलक प्रमाणात मिळत असतानाच गेल्या तीन दिवसांपासून खाडीत मृत मासे पाण्यावर तरंगताना आढळू लागले आहेत. त्यामुळे खाडी परिसरातील मच्छीमारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कोसळणाऱया पावसाचा फायदा उठवत सीईटीपीसह लोटेतील काही कंपण्यांनी आपले सांडपाणी नाल्याव्दारे खाडीत सोडले असल्याचा आरोप दाभोळखाडी परिसर संघर्ष समितीने केला आहे. यासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडसीसी तसा सीईटीपी व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी बुधवारी केतकी, करंबवणे येथे जाऊन पंचनामा करत खाडीतील पाण्याचे नमुनेही घेतले आहेत.









