मंडी खासदाराने सुक्खू सरकारवर साधला निशाणा
वृत्तसंस्था/ शिमला
हिमाचलमुळे ढगफुटी झाल्याने पूर आला असून यामुळे राज्यातील जनजीवन कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर मंडीच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतने मंगळवारी हिमाचलमधील प्रभावित भागांचा दौरा केला आहे. कंगना यांनी आपत्तीत प्रभावित झालेल्या लोकांना धीर दिला आहे. कंगना रनौत यांच्यासमोर अनेक पीडित महिलांनी आपत्तीमुळे निर्माण झालेल्या समस्यांबद्दल कैफियत मांडली आहे.
कंगनाने यावेळी पीडित महिलांची गळाभेट घेत त्यांना धीर दिला. तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत कंगनाने राज्यातील सुक्खू सरकारवर निशाणा साधला आहे. मागीलवेळी आपत्तीने प्रभावित विस्थापितांसाठी केंद्र सरकारकडून 1800 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले होते. परंतु राज्य सरकारने अद्याप या पॅकेज अंतर्गत निधी वितरित केलेला नाही. राज्य सरकारचे हे अमानवीय कृत्य आहे. काँग्रेस सरकार पीडितांसोबत अन्याय करत आहे. राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे लोकांनाच वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागत असल्याची टीका कंगनाने केली आहे.
सद्यकाळात हिमाचलमध्ये ढगफुटीच्या घटनांमुळे शिमला, मनाली आणि कांगडा जिल्ह्यांमध्ये जनजीवन प्रभावित झाले आहे. आपत्तीच्या सहाव्या दिवशीही बचावमोहीम सुरू आहे. या आपत्तीत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 38 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांच्या शोधासाठी सुरक्षा दलांकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. याकरता श्वानपथक, लाइक्ह डिटेक्टर आणि ड्रोनची मदत घेतली जात आहे.









